डिझेल दरवाढ आणि वाढत्या देखभालीच्या खर्चामुळे भाडेवाढ अनिवार्य; साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द
मुंबई: एसटी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सादर करण्यात आलेल्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रवासाला प्राधिकरणाने अधिकृत मंजुरी दिली असून ही नवीन दरवाढ आजपासूनच संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली मोठी वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली सुधारणा, तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि दैनंदिन देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यामुळे हा निर्णय घेणे भाग पडल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
हंगामी भाडेवाढ रद्द; प्रवाशांना काहीसा दिलासा
या नवीन आणि सर्वसमावेशक भाडेवाढीमुळे महामंडळाने प्रवाशांना एक छोटा दिलासाही दिला आहे. यापूर्वी साध्या बसेससाठी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच, आता प्रवाशांना केवळ नवीन निश्चित झालेल्या सुधारित दरांनुसारच तिकीट आकारणी केली जाईल. वाढत्या आर्थिक खर्चामुळे महामंडळाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा ताण निर्माण होत होता, ज्यामुळे एकूणच वाहतूक सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता होती.
सेवा सुरळीत ठेवण्यासाठी दरवाढ अटळ
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील लाखो प्रवाशांना दररोज सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड प्रवासाची सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ करणे अत्यंत आवश्यक आणि अटळ बनले होते. वाढत्या खर्चाचा भार सहन करत सेवा देणे कठीण झाल्यामुळे, महामंडळाचा दैनंदिन कारभार आर्थिक अडचणीत येऊ नये आणि ग्रामीण भागातील दळणवळणाची लाईफलाईन असलेली ‘लालपरी’ सुरळीत धावत राहावी, यासाठीच प्रशासनाला हा दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 18-07-2026














