Disha Committee Meeting Ratnagiri: “मी सुचवलेली कामे बदलल्यास लोकसभा हक्कभंग आणणार!” खासदार सुनील तटकरेंचा थेट जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इशारा

अधिकाऱ्यांच्या दांडीवर आणि ‘प्रगतीपथावर’च्या अहवालावर खासदार नारायण राणे संतप्त; गैरहजर अधिकाऱ्यांना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश

रत्नागिरी: “केंद्र आणि राज्य शासनाच्या जनतेशी निगडित विविध योजना आणि सार्वजनिक हिताची कामे ही वेळेतच पूर्ण झाली पाहिजेत. या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी प्रशासनाने स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने काम करावे,” अशा स्पष्ट सूचना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडलेल्या ‘जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण (दिशा) समिती’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला दिशा समितीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि सह-अध्यक्ष म्हणून खासदार नारायण राणे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बैठकीत लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे बदलल्याचे समोर आल्यानंतर अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, “मी सुचविलेली कामे बदलली गेली, तर मी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात लोकसभेत हक्कभंग दाखल करेन,” असा थेट इशारा प्रशासनाला दिला.

गैरहजर अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटिसा

या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला काही प्रमुख विभागांचे प्रशासकीय प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. या बेजबाबदारपणावर अध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि सह-अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “ही केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेली समिती असून अधिकाऱ्यांनी या समितीला असलेल्या अधिकाराचे भान ठेवावे. अशी बेजबाबदार अनुपस्थिती खपवून घेतली जाणार नाही,” अशा कडक शब्दांत सुनावत खा. राणे यांनी संबंधित अनुपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना दिले. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ नोटिसा बजावल्या जातील, अशी माहिती दिली.

“प्रगतीपथावर म्हणजे नेमके काय?” अहवालावरून राणेंनी धारेवर धरले

बैठकीसाठी प्रशासनाने सादर केलेल्या इतिवृत्तात बहुतांश कामांसमोर ‘प्रगतीपथावर’ (In Progress) असे नमूद करण्यात आले होते. यावरून खासदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी खडसावून विचारले:

  • कोणतेही काम नेमके किती टक्के पूर्ण झाले आहे?
  • किती टक्के काम अद्याप बाकी आहे?
  • काम पूर्ण होण्याची निश्चित तारीख (Dead Line) कोणती आहे? याची अचूक आणि सांख्यिकीय माहिती देणे प्रशासनाला गरजेचे आहे. “प्रगतीपथावर म्हणजे नेमके काय?” असा खडा सवाल उपस्थित करत खा. राणेंनी यापुढे अशी शासकीय कामांमधील चालढकल खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सर्व विभागांना पूर्ततेबाबत योग्य टक्केवारी, संभाव्य निधी आणि मुदतीसह अहवाल देण्याची तंबी दिली.

विविध शासकीय योजना व पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा

बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांवर सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले:

  • घरकुल व मातृवंदना योजना: ‘प्रधानमंत्री घरकुल योजना’ आणि ‘मातृवंदना योजना’ अधिक प्रभावीपणे राबवून माता-भगिनींमध्ये मोठी जनजागृती करावी. राजापूरच्या नगराध्यक्षा ॲड. खलिपे यांनी घरकुल पोर्टलवर १० प्रस्ताव गोळा झाल्याशिवाय अर्ज स्वीकारले जात नसल्याचा तांत्रिक मुद्दा मांडला. यावर तातडीने सुधारणा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना खा. तटकरे यांनी दिल्या.
  • शेतकरी पीक विमा: कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये मोठी जागृती निर्माण करावी. ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रस्ताव नामंजूर झाले आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत. कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडतही त्वरित काढण्याचे निर्देश देण्यात आले.
  • महामार्ग आणि पायाभूत सुविधा: मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल सप्टेंबर महिन्यात वाहतुकीस खुला होईल, तसेच संगमेश्वर-हातखंबा मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिली.
  • इतर विकासकामे: आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाची संरक्षक भिंत आणि पायऱ्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या २० बीएसएनएल (BSNL) टॉवर्सचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे सांगण्यात आले. महावितरणच्या संथ कामाबद्दल गुहागर पं.स. सभापती प्रणव पोळेकर यांनी नाराजी मांडताच, खा. तटकरे यांनी महावितरणला सुधारणा करण्याचा, अन्यथा कारवाईचा इशारा दिला.

लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

बैठकीची रूपरेषा: बैठकीच्या सुरुवातीला प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव यांनी सादरीकरणाद्वारे (PPT) जिल्ह्याचा प्रगती अहवाल सादर केला. याप्रसंगी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जि.प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 18-07-2026