चिपळुणात गुलाबी थंडीची चाहूल

चिपळूण : दिवाळी सणाच्या सांगतेबरोबरच लांबलेल्या परतीच्या मान्सूनने हंगामाची सांगता केली असून दिवाळीनंतर हवेतील उष्मा हळूहळू कमी होऊ लागला आहे. या वातावरणातील बदलामुळे रात्रीच्या वेळेपासून पहाटेपर्यंत हलक्या स्वरूपातील धुके पसरू लागल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. दिवाळी सणाच्या कालावधीपर्यंत मुक्काम ठोकून असलेल्या अवकाळी परतीच्या मान्सूनमुळे वातावरणात अनपेक्षित बदल घडत होते. सकाळच्या वेळेत कडक ऊन, दुपारनंतर जोरदार पाऊस असे वातावरण दिवाळीपूर्वी दररोज निर्माण होत होते.

दिवाळी सणानंतर मात्र आता वातावरणात हळूहळू बदल होऊ लागला आहे. मुक्काम ठोकलेल्या मान्सूनने परतीचा मार्ग धरला आहे तर वातावरण कोरडे झाल्याचे जाणवत आहे. या वातावरणातील बदलामुळे रात्रीच्यावेळी हलक्या स्वरूपाचे धुके पसरू लागले आहे. त्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. असे वातावरण पुढे दोन महिने राहिल्यास यावर्षी आंबा पिकाचे उत्पन्न चांगले येईल. आंब्याला मोहर येण्यास पोषक वातावरण हळूहळू तयार होत आहे. तर खरीप शेतीची कामे पूर्ण झाल्यावर रब्बी हंगामातील शेतीला वेग येईल. प्रामुख्याने कडधान्ये घेण्यास शेतकरी आतूर आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 06/Nov/2024