महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान

मुंबई : महायुतीच्या राज्यातील विविध ठिकाणी प्रचारसभा होत आहेत. दरम्यान, आज सांगलीच्या जतमध्ये गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा झाली.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(शप) प्रमुख शरद पवारांवर (Sharad Pawar) शारीरिक व्यंगावरुन अतिशच बोचरी टीका केली.

“शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसवाले असतील…देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहितीय का? गायीची जी कास आहे, त्या कासला चार थानं असतात. यामधील अर्धथानं वासराला पाजायचं (म्हणजे आपल्याला) आणि साडेतीन थानातलं दूध आपणचं हाणायचं. पण, देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, गायीचं सगळं दूध वासरांचं(राज्यातील जनतेचं) आहे, मी सगळं दूध वासरांनाच देणार..मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणाले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं..?”

“पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या…पण पवारसाहेबांना मानावं लागेल. ते म्हणतायत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र पाहिजे का?” अशी बोचरी टीका सदाभाऊ खोतांनी यावेळी केली. सदाभाऊंनी शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका केल्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका
यावेळी सदाभाऊंनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली. “उद्धव ठाकरे म्हणले एक जॅकेटवालं, एक दाढीवालं, पण उद्धव ठाकरे तुम्हीच दाढ्या कुरवाळत बसलात. अडीच वर्षात तुम्ही घराबाहेर निघाले नाही, शेतकऱ्याचा भाजीपाला सडला, दूध रस्त्यावर सांडलं, तुम्ही एकही रुपया शेतकऱ्याला मदत केली नाही, त्यामुळे तुम्हाला मतं मागण्याचा अधिकार नाही,” असं सदाभाऊ खोत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 06-11-2024