२,५४९ विद्यार्थ्यांची पडताळणी अद्याप प्रलंबित; मंडणगड तालुका पिछाडीवर
रत्नागिरी:
Ratnagiri District Student Aadhar Verification 2026 अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील आधार पडताळणीच्या कामात रत्नागिरी जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९८.१ टक्के विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाली असून उर्वरित काम पूर्ण करून जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
तालुकाानिहाय आधार व्हॅलिडेशन आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण १ लाख ९१ हजार ६८२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९१ हजार ८५ विद्यार्थ्यांचे आधार उपलब्ध आहेत. आतापर्यंत १ लाख ८८ हजार ४० विद्यार्थ्यांची पडताळणी यशस्वीरीत्या झाली आहे. तालुकाानिहाय स्थिती खालीलप्रमाणे आहे:
| तालुका | झालेले काम (विद्यार्थी) | प्रलंबित (विद्यार्थी) |
| रत्नागिरी | ४८,७४८ | ६१४ |
| संगमेश्वर | १६,५१६ | १९२ |
| खेड | २२,४८० | २१९ |
| गुहागर | ११,६७६ | ८९ |
| चिपळूण | ३७,१०७ | ७६५ |
| लांजा | ११,१०० | १२० |
| राजापूर | १४,४९१ | २०९ |
| दापोली | २०,००२ | १७९ |
| मंडणगड | ५,९२० | ८२ |
| एकूण | १,८८,०४० | २,५४९ |
संगमेश्वर व लांजा आघाडीवर, मंडणगड पिछाडीवर
आधार पडताळणीमध्ये संगमेश्वर तालुक्याने सर्वाधिक ९८.७० टक्के काम पूर्ण करून बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ लांजा ९८.६६ टक्के, रत्नागिरी ९८.५३ टक्के, गुहागर ९८.३५ टक्के आणि दापोली ९८.२८ टक्के अशी कामगिरी केली आहे. याउलट राजापूर ९७.९९ टक्के, खेड ९७.४१ टक्के, चिपळूण ९७.३१ टक्के, तर मंडणगड तालुका ९५.७९ टक्क्यांसह जिल्ह्यात सर्वात पिछाडीवर आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचे विधान:
“रत्नागिरी जिल्ह्यात आधार पडताळणीचे काम अत्यंत चांगले झाले आहे. बाहेरील कामगार व परप्रांतीयांची मुले शाळेत असल्याने त्यांच्या आधारमध्ये काही समस्या येत आहेत, त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित काम पूर्ण करून जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
पडताळणीचा मुख्य उद्देश
विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या शाळांमध्ये दुहेरी नोंद रोखणे, अचूक पटसंख्या निश्चित करणे, सरकारी निधी व शैक्षणिक सुविधा थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. शाळांची संचमान्यता अचूक करणे, शासकीय योजनांचा लाभ देणे आणि शैक्षणिक प्रवास ट्रॅक करणे हा या पडताळणीचा मुख्य हेतू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 17-08-2026














