कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप; तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची हेदवीवासीयांची मागणी
गुहागर शहर :
गुहागर तालुक्यातील हेदवी येथील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ च्या इमारतीचे काम गेली दोन वर्षे रखडले आहे. इमारतीचे प्रत्यक्ष काम केवळ ४० टक्के झाले असताना ठेकेदाराला तब्बल ७० टक्के रक्कम अदा करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अजब प्रकारामुळे ठेकेदार व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
गळक्या इमारतीतून सुरू आहे दवाखान्याचा कारभार
गेली दोन वर्षे नवीन इमारतीचे काम अर्धवट असल्याने शेजारी असलेल्या जुन्या व गळक्या इमारतीमधूनच पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार सुरू आहे. या जुन्या इमारतीचे छप्पर कधीही अंगावर कोसळेल अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. औषधांचा साठा पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी प्लास्टिकचे आवरण घालून संरक्षण करावे लागत आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुहागर पंचायत समिती, जिल्हा परिषद विभाग तसेच सभापती यांच्याकडे या अर्धवट कामाबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे.
मुदतीनंतरही ५० टक्क्यांहून अधिक काम अपूर्ण
जिल्हा वार्षिक योजनेमधून सन २०२३-२४ मध्ये या दवाखान्यासाठी १७ लाख ७५ हजार ५०० रुपये अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर झाली होती. सावर्डे येथील चेअरमन केदारनाथ मजूर सहकारी संस्था यांच्या नावावर १३ लाख ६२ हजार ६७५ रुपयांची निविदा मंजूर करून हे काम देण्यात आले होते.
मार्च २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, सध्याची वस्तुस्थिती पाहता ५० टक्क्यांहून अधिक काम अजूनही बाकी आहे. इमारतीची उंची वाढवून त्यावर स्टील फॅब्रिकेशनचे स्ट्रक्चर उभे करणे, जुने प्लास्टर काढून नवीन प्लास्टर करणे, लादी बसवणे, स्लायडिंग खिडक्या, ग्रील व ६३ क्युबिक मीटर पेव्हर ब्लॉक बसवणे अशा अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
निकृष्ट दर्जाचे काम आणि नियमांचे उल्लंघन
इमारतीचे झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. उंची वाढवण्यापूर्वी दरवाजे व खिडक्यांवर काँक्रीटची रिंग घेणे आवश्यक असताना ठेकेदाराने तयार काँक्रीट लँटर आणून त्यावर बांधकाम केले आहे. तसेच जुने प्लास्टर न काढताच त्यावर प्लास्टर जोडले गेले आहे. टाकलेल्या पत्र्यासाठी साडेतीन टन स्टील वापरणे आवश्यक असताना आणि ५x३ इंच आयबीमऐवजी ४x३ चे आयबीम वापरल्याचा आरोप केला जात आहे.
काम न करताच ९ लाख ५१ हजारांचे बिल अदा
इमारतीचे काम अवघे ३० ते ४० टक्के झालेले असताना १५ मे २०२५ रोजी ठेकेदाराला ९ लाख ५१ हजार ५७९ रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे. काम पूर्ण न करताच ७० टक्क्यांहून अधिक रक्कम दिल्याने या कामाचे तत्काळ मूल्यांकन करून अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाची भूमिका
“या कामाबाबत बांधकाम विभाग किंवा ठेकेदार यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रभाग समितीच्या बैठकीमध्ये हा रखडलेला विषय पुढे आल्यानंतरच काम अर्धवट असल्याचे स्पष्ट झाले.”
— आर्या मोरे (सरपंच, निर्मल ग्रामपंचायत हेदवी)
गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती नीलेश सर्व्हे या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणार का, तसेच तत्कालीन अभियंता व उपअभियंत्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण हेदवीवासीयांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 28-08-2026














