आम्ही सिद्ध लेखिका साहित्य संस्थेच्या वतीने रत्नागिरीत काव्यमैफल; २० कवी-कवयित्रींनी सादर केल्या कविता
रत्नागिरी: ‘आम्ही सिद्ध लेखिका’ अखिल भारतीय साहित्य संस्था, कोकण विभाग (रत्नागिरी) यांच्या वतीने स्थानिक कवी-कवयित्रींसाठी आयोजित करण्यात आलेली ‘रिमझिम रिमझिम’ ही काव्यमैफल नुकतीच उत्साहात पार पडली. रत्नागिरीतील अ.के. देसाई हायस्कूलच्या रंगमंचावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला कवींसह साहित्यप्रेमी व रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविक
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी ‘आम्ही सिद्ध लेखिका’ कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी, कार्यकारिणी सदस्य व कार्याध्यक्ष ऋतुजा कुलकर्णी तसेच समूहातील ज्येष्ठ सदस्या कुंदा बापट उपस्थित होत्या. प्रा. उमा जोशी यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका व संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
नव कवींना सातत्यपूर्ण सरावाचा सल्ला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सुनेत्रा जोशी यांनी आपल्या मनोगतात नवोदित कवींना झटपट प्रसिद्धीच्या मागे न लागता सतत सराव करून लेखनाची व सादरीकरणाची कला आत्मसात करण्याचा सल्ला दिला. तसेच राज्य कार्यकारिणीत प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड झालेल्या ऋतुजा कुलकर्णी यांचे कौतुक केले. कार्याध्यक्ष ऋतुजा कुलकर्णी व तंत्रज्ञान सहाय्यक उमा जोशी यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले.
२० कवी-कवयित्रींचा सहभाग; ‘इ-बुक’चा सुखद धक्का
या काव्यमैफलीत पावसाळा, निसर्ग आणि श्रावणातील विविध भावविश्व उलगडणाऱ्या कविता सादर करण्यात आल्या. यामध्ये वैजयंती पाटील, शमा प्रभुदेसाई, दीप्ती झगडे, प्रियांका रांजे, शर्विल रांबाडे, अनुष्का नागवेकर, श्रावणी शिंदे, कुंदा बापट, चित्रा गोस्वामी, वसुंधरा जाधव, रोहित नाटेकर, मानसी चव्हाण, प्रभात कोकझे, स्नेहल शेवडे, गौरी थत्ते, उमा जोशी, विस्मया कुलकर्णी, तन्वी पटवर्धन, अनुराधा आपटे, सुनेत्रा जोशी आणि ऋतुजा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अनुराधा आपटे यांनी केले. उत्कृष्ट कविता व सादरीकरणासाठी कवींना पुस्तके देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागींना पेन देण्यात आले. तसेच या कार्यक्रमात सादर झालेल्या कवितांचे ‘इ-बुक’ (E-Book) तयार केले जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
ऋणनिर्देश आणि सांगता
‘आम्ही सिद्ध लेखिका’ ही महिलांसाठीची संस्था असून त्यांनी प्रथमच स्त्री-पुरुष एकत्रित असा उपक्रम राबवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या अ.के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर आणि कर्मचारी परब यांचे आभार ऋतुजा कुलकर्णी यांनी मानले. शेवटी अल्पोपहारानंतर या बहारदार काव्यमैफिलीची सांगता झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:30 02-09-2026














