NDPS Act Case in Ratnagiri: भाट्ये टेबल पॉईंट येथे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी शहर पोलिसांची कारवाई; गांजा सेवन करताना दोन तरुण रंगेहाथ पकडले

रत्नागिरी: शहरानजीकच्या प्रसिद्ध भाट्ये टेबल पॉईंट परिसरात एका हॉटेलच्या बाजूला दगडाच्या आडोशाला अमली पदार्थांचे (गांजा) सेवन करणाऱ्या दोन संशयित तरुणांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी रात्री ८.३५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

साहिल शफीक मुजावर (वय २२, रा. भाट्ये दर्गा बस स्टॉप, रत्नागिरी) आणि सिद्धेश संतोष पावसकर (वय २४, रा. भाट्ये खोतवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयित तरुणांची नावे आहेत.

टेबल पॉईंट परिसरात रात्रीच्या वेळी कारवाई
पोलीस हवालदार शांताराम झोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ सप्टेंबर रोजी रात्री शहर पोलीस भाट्ये परिसरात गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. भाट्ये टेबल पॉईंट येथील एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या दगडाच्या आडोशात हे दोन्ही संशयित तरुण गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आले.

एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा नोंद
पोलीस हवालदार शांताराम झोरे यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ मधील कलम ८ (क), २७, आणि २९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 03-09-2026