अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास CID करणार

मुंबई : राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.

या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यानंतर विरोधकांकडून महायुती सरकारवर टीका करण्यात येत आहे. तसेच विरोधक काही प्रश्नही यासंदर्भात उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय शिंदेचा एन्काउंटर संशयाच्या भोवऱ्यात असून, आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार आहे.

अक्षय शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या प्रकरणावरून विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीवर घणाघाती टीका करत आहेत. यानंतर आता हा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे.

सीआयडीची टीम ठाण्यात येणार

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सीआयडीची टीम ठाण्यात येणार आहे. सीआयडीच्या अधीक्षक या तपासाचे प्रमुख असणार आहेत. फॉरेन्सिक टीमकडून आढावा घेतल्यानंतर आता सीआयडीकडून हा तपास केला जाणार आहे. मुंब्रा बायपासवर ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे सीआयडी अधिकाऱ्यांचे पथक जाणार आहे. घटनेच्या वेळी वाहनात उपस्थित असलेल्या पोलिसांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचेही जबाब सीआयडी अधिकारी घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. या घटनेनंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने पोलीस वाहनाची तपासणी केली.

दरम्यान, ठाणे पोलिसांनी या प्रकरणावर पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. जी घटना घडली, त्या घटनेची प्राथमिक अशी आहे की, अक्षय शिंदेवर बदलापूर पोलीस ठाण्यात बदलापूर येथील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा गुन्हा दाखल होता. तसेच अक्षय शिंदेच्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अक्षय शिंदेच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस करत होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची ट्रान्सफर ऑर्डर घेऊन कायदेशीररित्या सदर आरोपीचा ताबा तळोजा कारागृहामधून घेतला होता. त्यानंतर पोलीस अक्षय शिंदेला घेऊन जात असताना सदर आरोपीने पोलिसाची बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे पोलीस म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:00 24-09-2024