खेड : महाडनाका परिसरातील साई अपार्टमेंटमध्ये घरफोडी

खेड : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाडनाका परिसरातील साई अपार्टमेंटमधील डी विंगमधील तळमजल्यावरील बंद सदनिका अज्ञात चोरट्याने फोडली. या सदनिकचे मालक परगावी गेले असल्याने नक्की कोणत्या वस्तू चोरीला गेल्या, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

खेड शहरातील वर्दळीचे ठिकाण महाडनाका परिसर आहे. या परिसरात भरणे खेड दापोली मार्गालगत – असलेल्या साई अपार्टमेंटच्या डी विंगमध्ये तळमजल्यावर असलेल्या दोन क्रमांक असलेल्या जगदीश जाधव यांच्या मालकीच्या सदनिकेच्या दरवाजाचे कडी-कुलूप तोडून गुरुवारी ७ रोजी पहाटेच्या सुमारास घरफोडी झाल्याची बाब निदर्शनास आली. जाधव हे कामानिमित्त खेडबाहेर गेल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या घराशेजारी राहणारे मोज्जम चौगुले पहाटे नमाज पठण करण्यासाठी गेले होते. तेथून पुन्हा घरी येताना त्यांना जाधव यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी जाधव यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. जाधव यांच्या घरातील शयन कक्षातील कपाट व अन्य साहित्य अस्ताव्यस्त पडलेले पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जाधव कुटुंबीय खेडमध्ये आले नसल्याने घरातून कोणत्या वस्तूंची चोरी झाली हे समजू शकलेले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 09/Nov/2024