पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेला अभूतपूर्व यश : रत्नागिरीत ‘उत्सवी नाटक स्पर्धे’चा नवा विक्रम!

रत्नागिरी : राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत एक मोठी सांस्कृतिक क्रांती पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने आयोजित ‘कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची स्पर्धा’ सलग दुसऱ्या वर्षी (२०२५-२०२६) नवा इतिहास रचत आहे. आयपीएल (IPL) पेक्षाही प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या स्पर्धेने गावोगावच्या नाट्यपरंपरेला नवसंजीवनी दिली असून, ग्रामीण कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे.

पालकमंत्र्यांच्या ‘व्हिजन’मुळे ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ग्रामीण भागातील आणि मंदिरांच्या उत्सवांमध्ये नाटक करणाऱ्या रंगकर्मींना मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या या दूरदृष्टीतून आणि भक्कम पाठिंब्यामुळे साकारलेल्या या स्पर्धेने रत्नागिरीच्या रंगवर्तुळात नव्या उमेदीचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांची मोठी फळी उभी केली आहे. डॉ. सामंत यांच्या या उपक्रमामुळे खंडित झालेली गावोगावची नाट्यपरंपरा नव्या ऊर्जेसह पुन्हा सुरू झाली असून, ज्येष्ठ कलाकारांनाही नव्या दमाचे साथीदार मिळाले आहेत.

सलग १८० दिवस आणि ६० हून अधिक नाटकांचा विक्रम

गेल्या वर्षी (२०२४-२०२५) या स्पर्धेने ४७ नाटके सादर करून ‘आयपीएल’पेक्षाही जास्त काळ चालणारी स्पर्धा म्हणून विक्रम नोंदवला होता. यंदा डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेली ही स्पर्धा ३० मे २०२६ पर्यंत म्हणजेच सलग १८० दिवस चालणार आहे. आतापर्यंत यात ५३ नाटके सादर झाली असून, यंदा हा आकडा ६० च्या पार जाण्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेत ८० च्या दशकातील जुन्या संहितांपासून ते नव्याने लिहिल्या गेलेल्या ऐतिहासिक, पौराणिक आणि प्रायोगिक नाटकांचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे.

प्रत्येक उत्सवात रंगतेय नाटकांची मैफल; रसिकांचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद

नाट्यगृहात प्रेक्षक येत नाहीत या समजुतीला पालकमंत्र्यांच्या या उपक्रमाने छेद दिला आहे. कार्तिकी उत्सव, दत्तजयंती, होळी, माघी गणेशोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा ते अगदी वाडीपूजा आणि कलशारोहणासारख्या प्रत्येक उत्सवात ही नाटके सादर होत आहेत. कडाक्याची थंडी असो वा कडक उन्हाळा, खुल्या प्रांगणात चालणाऱ्या या प्रयोगांना रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून एक उत्तम रसिक घडवण्याचे कामही सहजरीत्या होत आहे.

उत्कृष्ट नियोजन आणि कलाकारांचा सन्मान

या भव्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह आणि प्रत्येक कलाकाराला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी अमर राणभिसे, अनिल दांडेकर, श्रीकांत भाटवडेकर यांच्यासह जवळपास १८ प्रगल्भ परीक्षकांची फळी गावोगावी जाऊन परीक्षण करत आहे. स्पर्धा प्रमुख अमेय धोपटकर आणि संतोष सनगरे यांच्यासह समन्वयक सुनील बेंडखळे आणि राजेंद्र कदम या आयोजनाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. तर घनश्याम मगदूम, सतीश दळी, सनातन रेडीज यांनी कार्यालयीन कामाचा पाठींबा या आयोजनात दिला आहे.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या या अनोख्या आणि विक्रमी उपक्रमाची ख्याती आता रत्नागिरी तालुक्याबाहेरही पसरली असून, इतर तालुक्यांमधूनही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विचारणा होऊ लागली आहे.