नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं आव्हान

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी निलेश राणे यांच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले होते.

तर उद्धव ठाकरे यांची 13 नोव्हेंबरला मालवणात सभा होणार आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे जर आमच्या विरोधात काही बोलले तर त्यांना परतीच्या रस्त्याने जावू देणार नाही, असा इशारा नारायण राणेंनी दिला होता. आता नारायण राणे यांना कुडाळ मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी थेट आव्हान दिले आहे.

वैभव नाईक म्हणाले की, मी गेल्या १० वर्षात काम केलं म्हणून राणेंना फिरावं लागतंय, मी केलेलं काम राणेंचे दोन्ही पुत्र करू शकत नाही. कुडाळ एमआयडीसीमध्ये नारायण राणे यांची जागा असून तिथे एकही उद्योग आणला नाही. नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना एकही उद्योग आणला नाही. दीपक केसरकर यांनी हत्ती हटाव मोहिम राबवली नाही, मात्र आम्ही हत्ती हटाव मोहिम राबवली, असे हल्लाबोल त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंना अडवण्याआधी आम्हाला अडवून दाखवा

ते पुढे म्हणाले की, नारायण राणे यांचं वय झालं, त्यांनी धमक्या देऊ नये. उद्धव ठाकरे यांना अडवण्यापेक्षा आधी आम्हाला अडवून दाखवा. भ्रष्टाचार केला असल्यास मला फासावर लटकवा. निलेश राणे यांच्याकडे दिवसाचे जावा आणि माझ्या विरोधात काही पुरावे असल्यास घ्यावेत. नारायण राणे मला वाळू चोर म्हणायचे, तेच राणे आज वैभव नाईक यांनी वाळू अडवली म्हणतात. राणे तिकिटासाठी या ना त्या पक्षात जात असतात, असे त्यांनी वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर केली.

आम्ही महाराजांचे मावळे

निलेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वैभव नाईक यांनी पाडला असं म्हटलं, तसेच माझ कुटुंब पाकिस्तानमध्ये जाणार असं ही म्हटल होतं. राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला. मी चांगली काम केल्यास लोक मला निवडून देतील. मी प्रामाणिकपणा दाखवत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो. एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांनी एकत्रित येऊन सांगावं. शिवसेना सोडून माझ्यासोबत ये म्हणून एकनाथ शिंदे सांगत होते. नारायण राणे हे राजकारणातले धृतराष्ट्र आहेत. रवींद्र चव्हाण, नारायण राणे यांनी सांगावे मी त्यांच्याकडे केव्हा गेलो. महाराजांचे मावळे आहोत आम्ही, मान मोडेन पण वाकणार नाही, असेही वैभव नाईक म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 09-11-2024