कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पारंपारिक दक्षिणायन किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ५ वाजून ४२ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे जेमतेम देवीच्या चरणापर्यंतच पोहोचून लुप्त झाली.
पूर्वीच्या अनुमानानुसार रविवारी सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत अपेक्षित होती, परंतु ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण आणि वाढलेल्या धूलीकणांमुळे किरणोत्सवाची तीव्रता कमी राहिली. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही १८ टक्क्यांनी वाढल्याचे पदार्थ विज्ञान विभागाचे निवृत्त प्राध्यापक मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.
दक्षिणायनाच्या कालखंडातील पारंपरिक किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ४.५५ वाजता महाद्वारातून आत आलेली सूर्यकिरणे १५ हजार ३०० लक्स इतकी नोंदविली होती, परंतु पुढच्या पंधरा मिनिटांतच वातावरण ढगाळ झाल्याने किरणांची तीव्रता कमी झाली. यावेळी हवेतील आर्द्रतेची टक्केवारी ४० टक्क्यांपासून ५६ टक्क्यांपर्यंत राहिली. या सूर्यकिरणांमध्ये अंबाबाईच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याइतकी तीव्रता राहिली नाही. त्यामुळे भाविकांची निराशा झाली. ५ वाजून ४७ मिनिटांनी किरणे देवीच्या उजव्या बाजूला लुप्त झाली त्यानंतर नंदादीपाच्या प्रकाशात देवीची कर्पुरारती करण्यात आली. यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धनंजय दिंडे, गणेश नेर्लीकर-देसाई उपस्थित होते.
किरणोत्सवासाठी एलईडी स्क्रीन
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिर परिसरात तसेच शहरात ठिकठिकाणी हा पारंपरिक किरणोत्सव साेहळा पाहण्यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. याद्वारे हा सोहळा पाहण्याचा आनंद भाविकांनी घेतला. बुधवारी (दि. १३)पर्यंत हा किरणोत्सव सोहळा रंगणार आहे.
पर्यटकांच्या वर्दळीमुळे धुलिकणांत वाढ
महाद्वार रोड आणि परिसरातील पर्यटकांची वाढलेली गर्दीही हवेतील धूलिकण वाढण्यात मदत करतात. त्याचा किरणोत्सवावर परिणाम होतो आहे. दिवसा उष्मा आणि रात्रीची थंडी यामुळे वातावरणातील आद्रतेत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे किरणोत्सवाच्या तीव्रतेवर फरक पडला आहे, असे प्रा. कारंजकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 11-11-2024