Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबईसह उपनगरात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सोबतच, ठाण्यात देखील वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रायगडला रेड अलर्ट

रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुण्यासाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला असून घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात 26 सप्टेंबरपर्यंत पावसाच्या सरी

गुजरात आणि राजस्थानातील काही भागातून मान्सून माघारी फिरल्यानंतर हरियाणा आणि पंजाबमधील देखील काही भागातून मान्सून माघारी परतला. मान्सून रेषा फिरोजपूर, चुरु, अजमेर, माऊंट अबू, सुरेंद्रनगर आणि जुनागढमधून जात आहे . महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि गोव्यात 26 सप्टेंबरपर्यंत काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आगामी तीन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस

पुणे शहर, परिसरासह पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, सोमवारी सायकांळी विजांचा कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरात गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन जाणवत आहे, उकाडाही वाढला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 25-09-2024