रत्नागिरी : कथा लेखन करताना बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापर करा. आकर्षक, अर्थपूर्ण शीर्षक आणि परिणामकारक शेवट, शब्दसंख्या, शुद्धलेखन, शैली अशा महत्त्वाच्या अनेक बाबींवर लक्ष द्या. तसेच आजच्या काळानुरूप मोबाईल, संगणक आदींच्या तंत्रज्ञानाची जुजबी माहितीही आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. अश्विनी निगर्वी यांनी केले.
आम्ही सिद्ध लेखिका साहित्य संस्था, जिल्हा रत्नागिरी, कोकण विभाग यांच्यावतीने आयोजित केलेली कथालेखन कार्यशाळा १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील लेखिकांसाठी दूरस्थ माध्यमातून घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल ७५ ते ८० लेखिका या कार्यशाळेत सहभागी झाल्या.
आम्ही सिद्ध लेखिका कोंकण विभाग, रत्नागिरीच्या अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा जोशी यांच्या पुढाकाराने आम्ही सिद्ध लेखिकाच्या महाराष्ट्र राज्यातील साहित्यिक सदस्यांसाठीच कथालेखन ह्या प्रकाराचे उत्तम मार्गदर्शन व्हावे व त्यातूनच उत्तम कथालेखिका निर्माण व्हाव्यात या उद्देशाने ह्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सुप्रसिद्ध कथालेखिका प्रा. अश्विनी निवर्गी यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यशाळेत प्रा. अश्विनी निवर्गी यांनी स्लाईड्सच्या माध्यमातून कथालेखनासाठी आवश्यक अशा मांडणीच्या अनेक मुद्यांवर सोदाहरण विस्तृत विवेचन केले. लेखन शैली, मुद्देसूद मांडणी, शुढलेखन, कथाबीज इत्यादींवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. लिखाणासाठी उत्तम वाचनही आवश्यक असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितले. ई-मेल, युनिकोड, वर्डफाईल, पीडीएफ, पेन ड्राईव्ह आदींचा वापर कसा करावा ते सांगितले. त्यांनी विविध विषयांवरील लिखाणाचे अनेक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. कार्यशाळा संपल्यावर उपस्थित लेखिकांच्या प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
या कार्यशाळेसाठी केंद्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षा पद्माताई हुशिंग (ठाणे) यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच कोंकण विभाग, रत्नागिरीचेही कौतुक व अभिनंदन केले.
कार्यशाळेचा शुभारंभ सरस्वती पूजनाने कोंकण विभाग, रत्नागिरीच्या अध्यक्ष सुनेत्रा जोशी यांनी केला. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना केली. उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रा. उमा जोशी यांनी केला. केंद्रीय समितीच्या कार्याध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी मनोगत व्यक्त केले आणि अश्विनी निवर्गी यांनी केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. स्वागत, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ. अनुराधा दीक्षित यांनी केले. या ऑनलाईन उपक्रमाची संपूर्ण तांत्रिक बाजू उमा जोशी यांनी उत्तमपणे सांभाळली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 12/Nov/2024













