राजापूर : बालस्वरूपातील कार्तिक स्वामींचा लाभदायक ठरणारा दर्शनयोग वर्षातून एकदाच विशिष्ट काळापुरता असतो. विशेषतः महिलांना हा दिवस सोडून अन्य कालावधीमध्ये श्री कार्तिकस्वामींचे दर्शन वर्ज्य असते. असा अनोखा दर्शनयोग वर्षातून एकदा म्हणजे कार्तिक पौर्णिमेदिवशी येतो. यावर्षीचा हा दर्शनयोग श्रीदेव कार्तिक स्वामींचा दर्शनयोग शुक्रवारी (ता. १५) रात्री ९ वा. ५४ मि. सुरू होत असून, तो उत्तररात्री २ वा. ५७ मिनिटांपर्यंत चालू राहणार आहे. श्रीदेव कार्तिक स्वामींचे बालस्वरूपातील कोकणातील एकमेव मंदिर शहरातील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिरामध्ये आहे.
दरम्यान, दर्शन योगाच्या कालावधीमध्ये भाविकांना सुखरूपणे दर्शन घेण्याची संधी मिळावी म्हणून संभाजीपेठ मित्रमंडळ, भक्तवत्सल भक्तीभाव मंडळ यांच्या वतीने जोरदार कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. हे मंदिर सुमारे सहाशे वर्षांपूर्वीचे असल्याचे बोलले जात असून त्यामध्ये शिवपार्वती परिवारासह श्रीदेव कार्तिकस्वामींची असलेली बालरूपातील मूर्ती दुर्मीळ आणि पुरातन आहे.
या पुरातन असलेल्या मंदिरामध्ये जिल्हाभरातील भक्तांसह कोल्हापूर, मुंबई, पुणे या राज्यांतील विविध भागांसह कर्नाटक राज्यातील बेळगाव यांसह अन्य राज्यांतीलही भक्तगण या मंदिरामध्ये या काळात दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:17 PM 12/Nov/2024













