खेड नगरपरिषदेच्या रहदारी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

खेड : नगरप्रशासन सुस्त, चार ठिकाणी साचलाय कचरा, दुर्गंधीमुळे पादचारी त्रस्त खेड (प्रतिनिधी) खेड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नागरिकांना स्वच्छतेविषयक उपदेशाचे डोस पाजणाऱ्या नगरपरिषदेच्या पाठीमागील रहदारीच्या रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगच्या ढीग साचले आहेत. ४ ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नगरप्रशासनाच्या निदर्शनास ही बाब येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खेड नगरपरिषदेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषय जनजागृती करत नागरिकांना परिसर चकाचक ठेवण्याबाबत सूचित केले. जात आहे. नागरिकांचा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र नगरप्रशासनाकडूनच सूचनांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे. नगरपरिषदेच्या असलेल्या रहदारीच्या मार्गावर ४ ठिकाणी सर्रासपणे कचरा टाकला जात आहे. हा कचरा नेमका टाकतो कोण, असा प्रश्न असला तरी शहरातून जमा होणारा कचरा याठिकाणच्या मोकळ्या जागेत स्वच्छता कर्मचान्याकडूनच टाकला जात असल्याचे समजते. यामुळे येथे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हाच कचरा मोकाट जनावरांकडून इतरत्र पसरवला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधीही पसरली आहे. याचा त्रास मार्गावरून ये-जा पादचाऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना होतो. याच मार्गालगत शंकराचे मंदिर आहे. येथे येणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मार्गावर ४ ठिकाणी कचऱ्याचे ढीगअसतानाही नगर परिषदेच्या निदर्शनास येत नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाचा जागर करणाऱ्या नगरप्रशासनाकडूनच मुख्य मार्गाला कचऱ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. त्या मुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी कचरा टाकण्याची गरजच काय, असा संतप्त सवालही पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात असून नगर परिषदेने या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 13/Nov/2024