दापोली : ‘पीएम श्री’ योजनेतून हर्णे जीवन शिक्षण शाळा होणार हायटेक

दापोली : ‘पीएम श्री’ योजनेतून जिल्ह्यातील १३ शाळा हायटेक करण्यात येणार होत्या; मात्र, आणखी ३ शाळा वाढवण्यात आल्या असून आता त्या एकूण शाळांची संख्या १६ झाली आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील हर्णे येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळा नं. १ या शाळेची निवड करण्यात आली आहे.

या वेळेस पाजपंढरी, हर्णे मराठी उर्दू, दाभोळ उर्दू, असोड या ५ शाळांनी माहिती भरली होती. त्यामधून तालुक्यामधून हर्णे शाळेची निवड झाली आहे. या शाळेमध्ये सध्या १७ शिक्षक कार्यरत आहेत. येथील पहिली ते सातवीपर्यंतचा एकूण ४६० असा पट आहे. या शाळेत एकूण १६ वर्गखोल्या आहेत. शाळेची इमारत ब्रिटिशकालीन असून या शाळेलासुद्धा १०० वर्षे होऊन गेलेली आहेत.

केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा गुणवत्ता आणि भौतिक सुविधेतही सर्वोत्कृष्ट होण्यासाठी केंद्र सरकारने उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पीएम श्री योजनेतून हायटेक शाळा बनवण्यासाठी जिह्यातील आणखी तीन शाळांची निवड झाली आहे. यापूर्वी निवड झालेल्या १३ शाळांची सर्वांगीण विकासकामे सुरू आहेत. २०२२ पासून या योजनेला सुरवात झाली असून सर्वप्रथम दापोलीमधील वाकवलीच्या शाळेचा गेल्या वर्षी सहभाग झाला आहे आणि आता हर्णे शाळेची देखील यावर्षी निवड झाली आहे.

केंद्र शासनाची पीएम श्री योजना खूपच उत्कृष्ट आहे. यामुळे त्या त्या शाळांचा विकास होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील १४ हजार ५०० शाळा उत्कृष्ट शाळा तयार करायच्या आहेत. तसेच याच धोरणानुसार पुढे दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून येणाऱ्या पिढीला दैनंदिन जीवनात त्या शिक्षणाचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला पाहिजे, हेच उद्दिष्ट आहे. अण्णासाहेब बळवंतराव, गटशिक्षणाधिकारी, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 13/Nov/2024