रत्नागिरी : पक्षी सप्ताहाचे निमित साधून वायंगणी (ता. मालवण) येथे पक्षीनिरीक्षण डॉ. श्रीकृष्ण मगदूम आणि चिंदर येथील वन्यजीव अभ्यासक स्वप्नील गोसावी यांनी सोमवारी (ता. ११) सकाळी केलेल्या पक्षी गणनेत नव्वदहून अधिक प्रजातींची नोंद झाल्याची माहिती दिली. यात राखी डोक्याचा बुलबुल ही संकटग्रस्त प्रजाती वायंगणी गावात आढळून आल्याचे मगदूम यांनी सांगितले. यावेळी वायंगणी हायस्कूलच्या छोट्या मुलांनीही सहभाग घेतला.
याबाबत माहिती देताना डॉ. मगदूम म्हणाले की, वायंगणी गाव जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आजूबाजूच्या इतर गावांच्या तुलनेत लहान असणाऱ्या या गावात वन्यजीवांच्या दृष्टीने महत्वाचे असणारे अधिवास आहेत. घनदाट जंगल, पाणथळ जागा, विस्तारलेले सडे आणि समुद्रकिनारे हे प्रमुख अधिवास वायंगणी गावांत आढळून येतात. अधिवासानुसार त्या त्या भागांत आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती बदलत जातात.
सोमवारी (ता. ११) सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ५ या वेळेत घेतल्या गेलेल्या मा पक्षीगणनेत नव्वदहून अधिक पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या. यामध्ये शिंजिर, फुलटोचा, शिपाई बुलबुल शिंपी, पल्लवपुच्छ कोतवाल, तांबट, कुटुरगा, व्याध यांसारखे स्थानिक पक्षी आढळून आले. पांढूरका भोवत्या, माॅटिगुचा भोवत्या, धुतर ससाणा, हिरवा वटवट्या यांसारखे स्थलांतरित पक्षी आढळून आले.
यंदा झालेला मुबलक पाऊस शिवाय अधिक लांबलेल्या परतीच्या पावसामुळे वायंगणी गावातील पाणथळ जागा अजूनही तुडुंब भरलेल्या आहेत. या पाणथळ जागांमध्ये लहान आणि मोठा बगळा, राखी बगळा, छोटा आणि भारतीय पाणकावळा, टिबुकली कुवा, ढोकरी, कमळपक्षी, पाणलावा यांसारखे अनेक पक्षी आढळून आले. महत्वाचे म्हणजे, राखी डोक्याचा बुलबुल ही संकटग्रस्त प्रजाती वायंगणी गावात आढळून आली आहे.
या पक्षीगणनेत ज्ञानदीप हायस्कूल, वायंगणी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सक्रिय आणि उत्साही सहभाग घेतला. ज्ञानदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक टकले आणि जाधव यांनी या पक्षीगणनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी सकाळच्या पक्षीगणनेच्या सत्रास उपस्थित होते. दिवाळीची सुटी सुरू असूनही विद्यार्थी भल्या सकाळी या पक्षीगणनेच्या सोहळ्यास उपस्थित राहिले, ही नक्कीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. शिवाय उत्साहाने दुर्बीण आणि कॅमेऱ्यांचा वापर करून पक्षीनिरीक्षणही केले. एकंदरीत इथला निसर्ग आणि इथले अधिवास पुढच्या पिढीच्या हातात सुरक्षित आहेत, असे मत डॉ. मगदूम यांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 13/Nov/2024













