रत्नागिरी : यंदाच्या मोसमातील अपेक्षित थंडीची प्रतीक्षा..

रत्नागिरी : गेले अनेक दिवस रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे थंडीचा कालावधी लांबला होता. त्यामुळे शहरासहीत ग्रामीण भागातही उकाड्याचा प्रभाव होता. गरम हवा, आर्द्रतेमुळे होणाऱ्या काहिलीमुळे नागरिक त्रस्त होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली असून, पहाटे गारवा जाणवू लागला आहे. किनारपट्टी भागातही तापमानात उतार झाल्याने दोन दिवसांपासून तापमानाचा पारा खाली आला आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी पहाटे कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदविले, तर मंगळवारी रात्री २४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सतत उकाडा सहन करावा लागत होता. तसेच कमाल तापमानातही सरासरीपेक्षा वाढ झाली होती. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टी भागात थंडीची चाहूल लागली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा खाली आल्याने दिवसभराचा उकाडा काहीसा कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत आहेत. त्यामुळे किनारी भागात कमाल आणि किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पहाटे, तसेच मध्यरात्री हवेत गारवा जाणवत असून, नागरिकांना दिलासा मिळत आहे. या बदलत्या वातावरणामुळे कोकणात थंडीची चाहूल लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमानात घट झाल्यामुळे पहाटे गारवा जाणवत असला, तरी या मोसमातील अपेक्षित थंडी मात्र अद्याप सुरू झाली नसल्याचे येथील बागायतदारांचे म्हणणे आहे.

पुढील दोन दिवस पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस अलर्ट देण्यात आला आहे. किनारपट्टी जवळील गावांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रामुख्याने १४ आणि १५ नोव्हेंबरला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 14/Nov/2024