कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसाही हा बिबट्या दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता घोसाळकर कोंडचे रहिवासी संजय घोसाळकर आपल्या काजूबागेत फेरफटका मारायला गेले असताना त्या ठिकाणी नवीन तयार होत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी बिबट्या दिसून आला. घोसाळकर यांना पाहताच बिबट्या उडी मारून जंगलात पसार झाला.
चिखली बाजारपेठेजवळ असणाऱ्या नदीच्या मोरीजवळ पाणी प्यायला आलेला बिबट्या अनेक ग्रामस्थांनी पहिला आहे त्यामळे संध्याकाळी घराबाहेर पडायला नागरिक घाबरत आहेत. कडवई मुस्लिम मोहल्ल्यातील निहाल खान यांच्या घरापाठीमागे बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. कडवई कुंभारवाडीतील निलेश कुंभार यांच्या घराजवळ असलेल्या खुराड्याची जाळी तोडून तीन कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. कडबई किंजळकर वाडीतील तरुण घराकडे परतत असताना रस्त्याच्या बाजूला त्यांना बिबट्याचे दर्शन आले. परंतू प्रसंगावधान दाखवत या तरुणांनी दुचाकीवरून पळ काढला. देवरूख परीक्षेत्राचे वनाधिकारी तौफिक मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्या आढळून आलेल्या ठिकाणी भेट देऊन उपाययोजना केली जाणार आहे, असे सांगितले. कडवई पंचक्रोशीत सर्वत्र बिबट्याचा संचार दिसून येत असल्याने लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 14/Nov/2024













