राजापूर : विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचारी प्रशिक्षणासह अन्य शासकीय काम आणि कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर येथे गेलेले वारकरी यांना ये जा करण्यासाठी गेलेल्या एसटी गाड्यांमुळे तालुक्यातील नियमित प्रवासी फेऱ्यांना याचा फटका बसला आहे. १२ आणि १३ या दोन दिवसांतील तालुक्यातील ५५ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे राजापूर एसटी आगाराचे दोन दिवसातील नियमित वेळापत्रक पुरते कोलमडून गेले. एसटी गाड्या रद्द झाल्याने ग्रामीण भागातील प्रवासांचे हाल झाले. त्यामुळे ग्रामस्थांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला.
पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण आणि त्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. तसेच कार्तिकी एकादशीनिमित्ताने श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूर येथे गेले आहेत. या वारकऱ्यांची ने- आण करण्यासाठीही गाड्या बुकींग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील नियमित फेऱ्यांसाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांनी आगार व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन एसटी आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 14/Nov/2024













