रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मी सलग चारवेळा निवडून आलो आहे. मला सातत्याने निवडून येण्याची सवय आहे. ही मालिका मी यापुढेही कायम ठेवणार; परंतु काहींना सतत पराभूत होण्याची सवय आहे, अशी कोपरखळी महायुतीचे रत्नागिरीतील उमेदवार उदय सामंत यांनी दिली.
नाचणे जिल्हा परिषद गटाच्या स्वामी समर्थ मंगल कार्यालय आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष दादा दळी, शिवसेनेचे बाबू म्हाप, जयसिंग घोसाळे, भैया भोंगले, प्रकाश रसाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सामंत म्हणाले, नाचणे गटासाठी सर्वाधिक विकासकामे केली आहेत. एमआयडीसीच्या माध्यमातून मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीला ८.५ कोटींचा विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे. २४ तास पाण्याची सुविधा, विविध योजनांचा महिलांसह इतरांना लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात आपल्याला सव्वा लाख मते मिळतील, मतदार यादीत माझे पहिल्या क्रमांकावर नाव आहे आणि पहिल्या क्रमांकावर राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेले तीन महिने रत्नागिरीत घाणेरडे राजकारण सुरू होते. या घाणेरड्या राजकारणाचा सूत्रधार कोण होता, हे आता समोर आले आहे; मात्र त्याचा फारसा विचार करत नाही. रत्नागिरी मतदार संघात आणि राज्यात उद्योग आले पाहिजेत, यासाठी तत्कालीन उद्योगमंत्र्यांकडे सातत्याने मागणी करत होतो; मात्र तेव्हा प्रतिसाद मिळाला नव्हता. जेव्हा मी स्वतः मंत्री झालो त्या वेळी जास्तीत जास्त उद्योग वळवण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या प्रमाणात रत्नागिरीतही उद्योग येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त हाताना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे असे सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 14/Nov/2024














