रत्नागिरी : मागील तीन महिन्यांपासून या मतदारसंघात काहीजण घाणेरडे राजकारण करून समाजात कलुषित वातावरण तयार करीत आहेत. याचा खरा सूत्रधार कोण, हे आता पुढे आले आहे. मी विधानसभेला उभा राहिल्यापासून माझी निशाणी एक नंबरला असून, आजही मी एक नंबरलाच आहे. काहीजण मात्र सातत्याने पडण्यासाठी उभे राहत असल्याची टीका महायुतीचे उमेदवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर केली.
रत्नागिरीतील नाचणे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, भाजप तालुकाध्यक्ष दादा दळी, माजी जि. प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे, माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, नाचणे सरपंच भैया भोंगळे यांच्यासह नाचणे गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
नाचणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने आपला प्रयत्न सुरू आहे. एमआयडीसीकडून साडेआठ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नाचणे गावातून जाणारा मुख्य रस्त्याचे कॉक्रिटीकरण सुरू आहे. ही ग्रामपंचायत शहरालगत असल्याने शहराप्रमाणेच २४ तास पाण्याची व्यवस्था होण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ गावातील दोन हजार महिलांना मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आपण मतदारांच्या पाठिंब्यावर सव्वालाखाचे मताधिक्य घेणार असल्याचा विश्वासही ना. सामंत यांनी व्यक्त केला. मागील तीन टर्ममध्ये मतदारसंघात उद्योग यावा यासाठी उद्योगमंत्र्यांचे सातत्याने उंबरठे झिजवले आहेत. मात्र, आता उद्योगमंत्रिपदच मिळाल्याने हजारो कोटींचे दोन प्रकल्प आणू शकलो. पुढील दोन-तीन वर्षांत येथील तरुण नोकरीसाठी बाहेर गावी जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पूर्वी आपण घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. २०१३ मध्ये शिवधनुष्य हाती घेतले, त्यानंतर आपण पक्ष बदलला नाही. आजही आपली निशाणी धनुष्य असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी
महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी मंगळवार व बुधवारी दिवसभर मतदारसंघातील विविध गावांत जाऊन भेटीगाठी घेतल्या. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. तालुक्यातील शिवार आंबेरे, गावखडी, मेर्वी, कुवारबाव, मिरजोळे, पोमेंडी, पानवल येथे बैठक व भेटी घेतल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 14/Nov/2024














