चिपळूण : विधानसभा निवडणुकीमुळे तालुक्यात गावोगावी उभारल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांना ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे. अद्याप एकही बंधारा बांधण्याच्या कामाला मुहूर्त सापडला नसल्याने हे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार, असा प्रश्न कृषी विभागाला पडला आहे.
चिपळूण तालुक्यात यावर्षी १३०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे कोकणात पावसाचे प्रमाण मुबलक असल्याने या कालावधीत नदीनाले तुडुंब भरून वाहतात. या पाण्याचा उपयोग व्हावा, ते पाणी वाहन न जाता जमिनीत झिरपावे यासाठी काही वर्षापूर्वी ‘मिशन बंधारे’ ही संकल्पना अंमलात आली. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, प्रत्येक गावागावांत बंधारे बांधण्यात येऊ लागले. यामध्ये वनराई, कच्चे तर विजय बंधान्यांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने कच्चे व वनराई बंधाऱ्यांची संख्या अधिक असते.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही तालुक्यात बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे उद्दिष्ट कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार १३० ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० बंधारे असे १३०० बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्यात मिशन बंधारे संकल्पनेचा प्रारंभ होतो. त्यानुसार याच महिन्यात सामाजिक संस्थाकडून पहिला बंधारा बांधला जातोः मात्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहितेमुळे अद्यापही कोणत्याच ग्रामपंचायतीसह विविध संस्थांना बंधारे बांधण्यासाठीचा मुहूर्त मिळालेला नाही शिवाय निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिकारी, कर्मचारीदेखील गुंतले असल्याने त्यांनी देखील मिशन बंधारे उपक्रम काहीसा बाजूला ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कृषी विभागाची कसरत
शासनाकडून यापूर्वी बंधारे बांधण्यासाठी विशेष अनुदानही प्राप्त होत असे. यातूनच बंधारे बांधण्यासाठी लागणारा खर्च केला जाई; मात्र हे अनुदान बंद झाल्यानंतर बंधारे लोकसहभागातून बांधण्याची संकल्पना रूढ झाली. यातूनच सहभागदेखील कमी होऊ लागल्याने मिशन बंधारे संकल्पना राबवण्यात काहीअंशी उदासीनता वाढू लागली. यामुळे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाला कसरत करावी लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 14/Nov/2024














