रत्नागिरी : निवडणुकीच्या कामांमुळे कृषीहानीचे पंचनामे रखडले

रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यातही मुक्काम वाढलेल्या पावसाने शेतीपिकांचे नुकसान केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता कापणी अंतिम टप्प्यात आली तरी विधानसभा निवडणुकीच्या कामाच्या ताणाने जिल्ह्यातील पंचनामे मनुष्य बळाअभावी रखडलेले आहेत. निदान प्राथमिक पाहणी तरी करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

ऑक्टोबरसह नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठिय्या मांडला होता. मात्र, त्यामुळे भाताच्या कापण्या रखडल्या होत्या. या पावसाने अनेक भागात भातपिक आडवे झाले होते. काही भगात कापणी केलेले भात भिजले. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे पावसाचा दिलासा मिळताच आता भातकापणी अंतिम टप्प्यात सुरू आहे.

निवडणुकीची धामधूम सुरू होण्याआधी कापणीच्या कामांचा उरक करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात अधिकारी वर्ग गुंतल्याने कृषी हानीची पाहणीही रखडली आहे. आता कापणी उरकल्यानंतर पंचनामेही करणे कठीण जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 PM 18/Nov/2024