बडनेरा : मुद्द्यांपासून दूर ठेवण्याचे काम कोणी करत असेल, तर त्याला धडा शिकवा. आपल्याला व्यवस्था बदलण्याची गरज आहे. ही लढाई जिंकायची आहे. आमच्याशिवाय सरकार बनणारच नाही, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त करताच गर्दीतून एकच उत्स्फूर्त जल्लोष उमटला.
बडनेरात त्यांची अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्या प्रचारासाठी सभा झाली.
बडनेरा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्याकरिता रविवारी सायंकाळी ७ वाजता आठवडी बाजार परिसरातील मैदानावर बच्चू कडू यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला मोठी गर्दी जमली होती. तुमच्याशिवाय प्रीती बंड या एक पाऊलदेखील समोर टाकणार नाहीत, हा मला विश्वास आहे. ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे, गर्दीवर जाऊ नका, आपल्या हाती केवळ दोन दिवस उरले आहेत. प्रीती बंड यांच्या विजयाची वाट तुमच्या हाती आहे. ‘अभी कोई हमारी जीत रोक नही सकता’, असे बच्चू कडू आपल्या भाषणात म्हणाले. सभेला ज्ञानेश्वर धाने पाटील, दिनेश बूब, नाना नागमोते, जितू दुधाने, राजू वानखडे, आशिष धर्माळे, प्रकाश बनसोड, अयूब खान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. विविध संघटनांनी प्रीती बंड यांना याठिकाणी पाठिंब्याचे पत्र दिले. एवढी गर्दी पाहून मी भारावले आहे. अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी एवढे लोक असताना कोण म्हणेल, मी एकटी आहे?, ही लढाई आता माझ्या एकटीची नसून, आपल्या सर्वांची झाली आहे. आपण मला बळ द्यावे, असे प्रीती बंड याप्रसंगी म्हणाल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 18-11-2024














