विरार : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना वसई-विरारमध्ये अभूतपूर्व राडा झाला आहे.
यात भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे 5 कोटी रुपये वाटत असताना सापडल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीच्या (BVA) कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. विरार पूर्वेला मनोरीपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे (Vinod Tawde) आले होते. याठिकाणी भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक (Rajan Naik) आणि भाजपचे काही पदाधिकारी हजर होते. विनोद तावडे यांना पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आल्याचा आरोप बविआकडून करण्यात आला. विनोद तावडे हे हॉटेलमध्ये असताना हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि बविआचे कार्यकर्ते याठिकाणी येऊन धडकले आणि त्यानंतर विवांता हॉटेलमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
फ्लायींग स्कॉड घटनास्थळी दाखल
दरम्यान, या प्रकरणावर आता अतिरीक्त मुख्य निवडणुक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी भाष्य करत या संदर्भातील माहिती दिली आहे. विनोद तावडे प्रकरण संदर्भात फ्लायींग स्कॉड घटनास्थळी पोहचले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. पोलिस अधिकारी या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करत आहे. उमेदवाराला 48 तासात त्या मतदारसंघात जाता येत नाही. त्यामुळे या संदर्भात ही चौकशी केली जाईल असेही डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले. माहीती मिळताच या ठिकाणी निवडणूक अधिकारी पोहचले असून नियमानुसार आता कारवाई केली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया-
सदर सर्वप्रकरणावर विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी इथल्या कार्यकर्त्यांना मतदानासंदर्भात माहिती द्यायला आलो होतो. बहुजन विकास आघाडीच्या लोकांचा गैरसमज झाला, की मी पैसे आणले. त्यांनी सगळं तपासलं पण काहीच पैसे मिळाले नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे. सगळं गैरसमजातून झालं, असं विनोद तावडे यांनी सांगितले.
मला भाजपवाल्यांनीच सांगितलं- हितेंद्र ठाकूर
विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत हे भाजपवाल्यांनीच मला सांगितलं. मला वाटलं विनोद तावडे राजकीय नेते आहे, हे असं छोटं काम करणार नाही. मात्र आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तेव्हा ते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते, असा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकूर यांनी केला. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही बंद होता. आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही चालू केला. हॉटेल मालकांनी असं का केलं, हे त्यांनाच विचारा…सीसीटीव्ही बंद केला, त्यामुळे हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 19-11-2024