एवढा पैसा आला कुठून, भाजपनेच नोटबंदी केली होती ना?; भाजपच्या ओरीजनल लोकांकडून अशी कृती घडणं धक्कादायक : सुप्रिया सुळे

मुंबई : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एवढा पैसा आला कुठून, भाजपनेच नोटबंदी केली होती ना? असा सवाल सुळे यांनी केला आहे. विनोद तावडेंवर आरोप होतोय यावर माझा विश्वास बसत नाही. हे धक्कादायक असल्याचे सुळे म्हणाल्या. मला कधीच असं वाटलं नव्हतं की भाजपच्या ओरीजनल लोकांकडून अशी कृती घडेल असे सुळे म्हणाल्या. 5 कोटींचं वाटप होतेय. श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये पोलीस येतात, अनिल देशमुखांवर हल्ला होतो, या देशात चाललंय तरी काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

भाजपकडे हे पाच कोटी रुपये आले कोठून?

ब्लॅक मनीमुळं नोटबंदी भाजपनेच केली होती. मग भाजपकडे हे पाच कोटी रुपये आले कोठून असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या गलिच्छ कृतीचा मी निषेध करत असल्याचे सुळे म्हणाल्या. भाजपचे सरकार येणार नाही हे त्यांच्या नेत्यांना समजले असेल असा टोलाही सुळे यांनी लगावला. विनोद तावडेंकडून ही अपेक्षा नव्हती. ते महाराष्ट्रात मंत्री राहिलेत, ते शिक्षणमंत्री होते असेही सुळे म्हणाल्या. काल रात्री श्रीनिवास पवार यांचा फोन आला, तेव्हा मी जेवत होते. तेव्हा मुलगी आणि ताट बाजूला ठेवलं, साहेब पण म्हणाले मी पण निघतो. पण नको म्हणाले. मुलगी आणि मी निघालो, तेवढ्यात परत श्रीनिवास पवार यांचा फोन आला अधिकारी तपास करुन परत गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही निम्म्या वाटेतून परत आल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नेमकं प्रकरण काय?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या (BVA) कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विनोद तावडे गेल्या अडीच तासांपासून हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. बविआच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी ठिय्या देत तावडेंची वाट रोखून धरली आहे. या घटनेनंतर पोलीस आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 19-11-2024