मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा आमदार क्षितिज ठाकूर यांनी हा आरोप केला असून, विनोद तावडे यांच्याकडील डायरीत महत्त्वाच्या नोंदी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १० लाखांची रक्कमही निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, गृहखात्याकडे बोट दाखवले आहे.
नालासोपारा-विरार येथील हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि भाजपा उमेदवार राजन नाईक यांची एक बैठक झाली. तेव्हाच त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले. विनोद तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. तर ५ कोटी रुपये वाटपासाठी आणल्याचा मोठा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. लगेचच तिथे क्षितिज ठाकूर पोहोचले. बविआ आणि भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी हॉटेलमध्ये झाली होती. तब्बल चार तासांनी विनोद तावडे हे या हॉटेलात अडकून पडले होते. शेवटी हितेंद्र ठाकूर, पोलीस यंत्रणा आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विनोद तावडे बाहेर पडले.
गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे अडकतील याचा बंदोबस्त केला
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार विनोद तावडे यांच्याबद्दल भाजपाच्या प्रमुख नेत्यानेच हितेंद्र ठाकूर यांना दिली. विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील, हा बहुजन समाजाचा चेहरा आहे, राष्ट्रीय महासचिव आहे, त्यांच्या हातात सूत्र आहेत. मोदी-शाहांच्या जवळचा माणूस आहे. त्यांना या पद्धतीने पकडून द्यावे, यासाठी भाजपाने कारस्थान झाले. भाजपामधील बहुजन समाजाचे एक नेतृत्व पुढील निवडणुकीत अस्तित्वात राहू नये, म्हणून हा खेळ झाला असावा. महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून विनोद तावडे यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि विनोद तावडे जाळ्यात सापडतील, यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला, असे मला वाटते. तावडे कांडामुळे भाजपामधील काही लोक आनंद व्यक्त करत असतील. ज्यांच्याकडे गृहखाते आहे, त्यांना यासंदर्भात जास्त माहिती असते, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.
दरम्यान, विनोद तावडे ५ कोटी घेऊन येत आहेत, हे भाजपावाल्यांनीच मला सांगितले. मला वाटले की, विनोद तावडे राजकीय नेते आहे, हे असे छोटे काम करणार नाही. मात्र आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तेव्हा ते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते. हॉटेलमधील सीसीटीव्ही बंद होता. आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही चालू केला. हॉटेल मालकांनी असे का केले, हे त्यांनाच विचारा. हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला पाहिजे. विनोद तावडे मला सारखे फोन करत होते. मला सोडवा, माझी चूक झाली, मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत होते. विनोद तावडे यांनी मला २५ फोन केले, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 19-11-2024