सिंधुदुर्ग : विनोद तावडे यांच्यासारख्या एका पक्षाच्या नेत्याला अशाप्रकारे वागणूक देणे मला पसंत नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केले आहे. विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मंगळवारी विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता.
बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना तब्बल चार तास विवांता हॉटेलमध्ये रोखून धरले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नारायण राणे (Narayan Rane) यांनी विनोद तावडे यांना मिळालेली वागणूक आपल्याला आवडली नसल्याचे म्हटले आहे.
नारायण राणे यांनी बुधवारी दुपारी आपली पत्नी आणि दोन्ही मुले आणि सुनांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, निलेश आणि नितेश दोघेही मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. ज्यांना मी घडवलं, ज्यांनी माझ्या घरी खाल्लेलं, तेच इथे विरोधक आहेत. द्वेषापोटी त्यांचा विरोध आहे. राजकीय विरोध नाही. इथल्या लोकांना माहिती आहे आमच्याशिवाय इथे विकास कोणीही करु शकत नाही. त्यामुळे लोकांना मी हवा आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही मुलांना मंत्रीपद मिळायला हवे, अशीही इच्छाही अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. माझी दोन्ही मुलं मंत्री झाली तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. ईश्वराच्या कृपेने तसं घडलं तर चांगलंच आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 20-11-2024