छ. शिवाजी महाराजांचा ६० फूटी पुतळा राजकोट येथे उभारणार, बांधकाम विभागाकडून २० कोटींची निविदा प्रक्रिया

मालवण : मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा ६० फूट उंच तलवारधारी पुतळा राज्य शासन उभारणार आहे. पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महिनाभरातच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.

राजकोय येथील पुतळा कोसळल्यानंतर नव्याने पुतळा उभारण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्यांच्या अहवालानुसार नवीन पुतळा उभारण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या महायुती सरकारने तातडीने हाती घेतले आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ज्या धर्तीवर उभारण्यात आला आहे, तेच सर्व निकष ठेवून राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी कामात कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी राज्य शासनाने ५०० पेक्षा जास्त पानांचे निकष असणारी निविदा प्रसिद्ध केली आहे.

पुतळ्याची देखभाल दहा वर्षे ठेकेदाराकडे

नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आयुर्मान सुमारे १०० वर्षे इतके असणार आहे. १० वर्षे या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती त्या ठेकेदाराने करायची आहे. ३ फुटांचे फायबर मॉडेल तयार करून हे मॉडेल कलासंचालनालयाकडून मंजूर करून घ्यावयाचे आहे. आयआयटी पवई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनुभव असणाऱ्या व्यक्तींना हा पुतळा उभारण्याचे काम देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शिवप्रेमींमध्ये समाधान

२६ ऑगस्ट रोजी पुतळा कोसळल्यानंतर सर्वच ठिकाणी शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत होती. पण, आता नव्याने पुतळा उभारणीचे काम राज्य शासनाने हाती घेतल्यामुळे शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:16 25-09-2024