बीड : राज्यातील बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना काही मतदारसंघात गोंधळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील घाटनांदूर येथे राडा झाल्याचं पाहायला मिळालं, त्यानुसार तीन मतदान केंद्रावर 1 तास मतदान यंत्रणा बंद होती.
त्यामुळे, बीड जिल्ह्यातील मतदानाचा दिवस चांगलाच चर्चेत आला आहे. एकीकडे राड्यामुळे बीड (Beed) जिल्हा चर्चेत असतानाच, दुसरीकडे बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली. बीड विधानसभा मतदारसंघाचे (Vidhansabha) अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. आपल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
बाळासाहेब शिंदे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. त्यामुळे, आज मतदानाच्यादिवशी ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् ते खाली पडले. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिंदे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून उमेदवार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनाही या घटनेनं मोठा धक्का बसला आहे.
बीडमध्ये चौरंगी लढत
बीड विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असतानाही दोन अपक्ष उमेदवारांचा अर्ज आल्याने ही निवडणूक चौरंगी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून योगेश क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना दोन अपक्षांचे आव्हान असणार आहे. त्यामध्ये, मनोज जरांगे पाटील समर्थक अशी ओळख असलेल्या अनिल जगताप हेही निवडणूक लढवत आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे याही अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत बीडकर कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात ते पाहावे लागेल.
साताऱ्यात मतदान करताना नागरिकाचा मृत्यू
सातारा (satara) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने (heart attack) जागीच मृत्यू (dies) झाला आहे. जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडली आहे. शाम धायगुडे असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. ते 67 वर्षाचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 20-11-2024