महाराष्ट्रात महायुतीचे बहुमताचे सरकार येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षांचा कार्यकाळ लोकांनी पाहिला आहे. महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केलेले आहे. मतदान लोकशाहीला प्रगल्भ करणारे आहे.

येणारे सरकार महायुतीचे, बहुमताचेच असेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर व्यक्त केला.

मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांचा कारभार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला. २०१९ च्या निकालानंतर महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाले. जनता ही घटना विसरलेली नाही. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची दशा कोणी केली आणि विकासाची दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे. या राज्याचा केलेला विकास, सुरू केलेल्या कल्याणकारी योजना लोकांना माहीत आहेत. अनेक योजना या सर्वसामान्यांसाठी आहेत. लाडकी बहीण, भाऊ, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगारांसाठी आम्ही काम केले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाकडे नेण्यासाठी आम्ही काम केले आहे.

दरम्यान, शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि शिंदे कुटुंबातील इतर सदस्यांनीही मतदान केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 21-11-2024