राजापूर मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढला

राजापूर : राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रापासून मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केले. त्यामध्ये पुरुषांच्या जोडीने महिला, तरुण, वयोवृद्ध यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. सायंकाळी ६ वा. पर्यंत ६३ टक्के मतदान झाले. गतवेळची विधानसभा निवडणूक (५५.४९ टक्के) आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक (५८ टक्के) या तुलनेमध्ये यावेळी राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का जास्त राहिला आहे.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील ३४५ मतदान केंद्रांवर काल मतदान होऊन मतदारसंघातील आठ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतदान पेटीमध्ये बंद केले.

सकाळच्या सत्रातील पहिल्या दोन तासांमध्ये २४.०७ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. त्यानंतरही मतदानाचा ओघ कायम राहताना दुपारपर्यंत ४०.९८ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वा. पर्यंत ५२.१९ टक्के, तर सायंकाळी ५ वा. पर्यंत ६१.०५ टक्के मतदान झाले.

उमेदवारांचे मतदान
महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी आपल्या पाली या मूळ गावातील मतदान केंद्रावर तर महाविकास आघाडीचे आमदार राजन साळवी यांनी लांजा तालुक्यात गोंडेसखल मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. तर, अपक्ष उमेदवार अविनाश लाड यांनी साखरपा येथील मतदान केंद्रावर तर माजी आमदार गणपत कदम यांनी राजापूर शहरातील गोखले कन्या शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

राजापूर येथे मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिला लोकशाहीमध्ये आम्हाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. त्याप्रमाणे यापूर्वी झालेल्या विविध निवडणुकांमध्ये बजावला आहे. त्यासोबत आजही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे.- शोभा लाड, ज्येष्ठ मतदार, दळे

विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क आम्ही बजावला आहे. मतदान केंद्रावर अन्य मतदारही उत्स्फूर्तपणे मतदानासाठी आले होते. आता प्रतीक्षा आहे निकालाची. -प्रकाश वळंजू, मतदार

मतदार म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान केले आहे. लोकशाहीमध्ये मतदानाचा प्राप्त झालेला अधिकार आज बजावला आहे. – ऋतिक बाईत, नवमतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 21/Nov/2024