मतदानादरम्यान महाराष्ट्रात कुठे-कुठे हिंसक घटना?

बीड : परळी मतदारसंघात सकाळपासूनच राडा होण्यास सुरूवात झाली. काही केंद्रांवर सीसीटीव्ही बंद असताना सकाळी मतदान सुरू होते. त्यानंतर शहरातील एका केंद्रावर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाच्या नेत्याला बेदम मारहाण केली.

याचे पडसाद अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावात उमटले.

काही अज्ञात लोकांनी येऊन ईव्हीएम मशीनसह इतर साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे दोन तास मतदान थांबले होते. केज तालुक्यातील विडा आणि पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी येथे भाजप व शरद पवार गटाचे दोन गट समोरासमोर भिडल्याने तणावाचे वातावरण होते. या सर्व घटनांचे कथित व्हिडीओही व्हायरल झाले होते. परळी वगळता इतर ठिकाणी शांततेत मतदान झाले.

परळीतील जलालपूर येथील महिलांना दमदाटी करण्यात आली. धर्मापुरी येथील केंद्रावर वेब कास्टिंगच्या कॅमेऱ्याची पिन काढून मतदान चालू होते. यावेळी देशमुख व काही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

मतदान केंद्राबाहेर थांबले असताना नेत्याला मारहाण

परळी शहरातील बँक कॉलनीतील मतदान केंद्राबाहेर थांबलेले शरद पवार गटाचे नेते ॲड. माधव जाधव यांना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे समर्थकांनी बेदम मारहाण केली. याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

घाटनांदूर येथील मतदान केंद्रातील तोडफोडीमुळे दोन तास प्रक्रिया थांबली होती. परंतु, नंतर सर्व नवीन मशीन उपलब्ध करून देत प्रक्रिया सुरळीत झाली. ज्यांनी अगोदर मतदान केेले होते, ते सर्व सुरक्षित आहे. ज्यांनी गोंधळ घातला, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. – अविनाश पाठक, जिल्हाधिकारी, बीड

स्वराज्य पक्षाचे उमेदवार डिक्कर यांच्यावर हल्ला

वरवट बकाल (बुलढाणा) : जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांचे वाहन चार ते पाच दुचाकीस्वारांनी अडवून दगडफेक करीत त्यांच्यावर शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना पहाटे पाच वाजता वरवट बकाल-शेगाव मार्गावरील कालखेड फाट्याजवळ घडली. डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्या छातीमध्ये दुखापत झाली आहे. अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मतदान केंद्रांवरून ईव्हीएम पळविल्याचा आरोप; कार्यकर्ते संतप्त

अमरावती : गोपालनगरस्थित राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवरून अज्ञातांनी दुचाकीहून ईव्हीएम पळवून नेल्याचा आरोप स्थानिकांनी केल्याने परिसराला रात्री पोलिस छावणीचे स्वरूप आले. सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार उघड झाला. मात्र रात्री उशिरापर्यंत वातावरण निवळले नव्हते. बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तुषार भारतीय व प्रीती बंड यांच्यासह कार्यकर्ते तेथे तळ ठोकून राहिले. उशिरा रात्रीपर्यंत हा वाद सुरू होता.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा ईव्हीएम असलेल्या कारवरच हल्ला

नागपूर : नागपूर मध्य मतदारसंघात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त ईव्हीएम मशीन असलेल्या निवडणूक आयोगाच्या कारवरच काही तरुणांनी हल्ला केला. हल्ला करणारे तरुण काँग्रेस कार्यकर्ते होते व गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे पोलिस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोल्हापुरात दोन गटांत धक्काबुक्कीने तणाव

कोल्हापूर : कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल माळी यांना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर, काँग्रेससह दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते आमने-सामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. आमदार सतेज पाटील यांनी समजूत काढत जमावाला शांत केले. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, सत्यजीत कदम यांना दुसरीकडे जाण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. सुमारे तासभर तिथे तणावपूर्ण स्थिती होती.
उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल माळी (रा.कसबा बावडा) यांनी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यावरून हा वाद निर्माण झाला होता.

शरद पवार गटाचे प्रवक्ता कराळे मास्तरांना मारहाण

वर्धा : बुथवर चिठ्ठ्या वाटपावरून झालेल्या राड्यात शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे यांना मारहाण करण्यात आली. महायुती व मविआचे गट आमने-सामने आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. दरम्यान, दोन्ही गटातील महिलांनी एकमेकांविरुद्ध सावंगी पोलिसात तक्रार दिली.

तक्रारीनुसार, उमरी मेघे येथील मतदान केंद्राच्या पाचशे मीटर अंतरावर पोलिंग बूथ लावले होते. नितेश कराळे व त्यांची पत्नी हे दोघेही मांडवा येथे मतदान करून परतत असताना ते उमरी येथे थांबले.

कराळे बूथवर गेले आणि विनाकारण चिठ्ठ्या वाटपावरून वाद करू लागले. इतके लोक चिठ्ठ्या वाटपासाठी कशाला पाहिजे, असे म्हणत शिवीगाळ करू लागले. दरम्यान, सचिन खोसे यांच्याशी त्यांची धक्काबुक्की झाली. खोसे यांनी कराळेंना मारहाण केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 21-11-2024