मुंबई : महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजवरचा अनुभव आहे की, जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्र पक्षालाला त्याचा फायदा होतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं.
मला विश्वास आहे की त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन होईल असे फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरुन मुंबईला रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली
यावेळी महिलांचा देखील मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसत आहे. मी काही मतदारसंघात संपर्क केले, तिथून मला फीडबॅक मिळाला आहे की महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याचे फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदारांची टक्केवारी वाढल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील फडणवीस म्हणाले. आम्ही अजूनही कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्रीपदा संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. परवा निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय करु अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे, कारण लोकांना सरकारबद्दल थोडी आपुलकी वाटते असं त्याचा अर्थ असल्याचे फडणवीस म्हणाले.
राज्यात विक्रमी मतदान, 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत
राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत काढताना भरभरून मतदान केलं आहे. 2024 च्या सर्वात लक्षवेधी आणि राजकारणाची खिचडी झाली असतानाच 65.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांचे मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) झाला असून 76 टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात 84.79 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, मतदानानंतर काल एक्झिट पोल आले आहेत. यानुसार महायुतीच्याच जागा जास्त येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याबाबतची खरी परिस्थिती 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 21-11-2024