महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?; संजय राऊतांचा दावा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Result) राज्यात 20 नोव्हेंबर 2024 मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल (Exit Poll 2024) आले आहेत.

काही संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुती (Mahayuti) मुसंडी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केलाय.

संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला पाच जागाही मिळणार नाही, असे म्हटले होते. पण ते 40 जागा जिंकले. मोदींना 400 जागा मिळणार, असे अंदाज होते. त्यांना बहुमत सुद्धा मिळाले नाही. लोकसभेत महाविकास आघाडीला दहा देखील जागा मिळणार नाही, असाही अंदाज होता. मात्र आम्हाला 31 जागा मिळाल्या. त्या सर्वेची ऐसी की तैसी, विधानसभेला महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे सर्व्हे कुणी आणि कसे केले? कुठल्यातरी कंपन्या येतात, एक्झिट पोल करतात, आमचा यावर विश्वास नाही. आम्ही 26 तारखेला सरकार बनवत आहोत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

अपक्षांचा आम्हाला पाठिंबा

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अपक्ष आणि बंडखोर नेत्यांशी संपर्क साधण्याची सुरुवात झाल्याची माहिती समोर आली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, सरकार अधिक मजबूत करायचे असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात, किंवा लहान पक्ष येतात. आमच्या सोबत शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, डावे पक्ष आहेत. ते निवडून येत आहेत त्यामुळे आत्तापासून त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांचा खळबळजनक दावा

ते पुढे म्हणाले की, आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जे उशाशी नोटांचे बंडल घेऊन झोपतात, ते गादीमध्येही पैसे टाकून झोपतात. त्यांनी आत्तापासूनच अपक्षांना 50 कोटी, 100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजेच आम्ही जिंकत आहोत, हे तुम्ही सर्व्हेवाल्यांना सांगा. त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर त्यांनी लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना पैशांच्या थैल्या पाठवल्या नसत्या, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 22-11-2024