योगायोग! उद्या विधानसभेचा निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला 5 वर्ष पूर्ण होणार

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या शनिवारी समोर येणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी लढत झाली. काही एक्झिट पोलने महायुती तर काही पोलने महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.

उद्या शनिवारी निकाल समोर येणार आहेत, २३ नोव्हेंबरचा एक विलक्षण योगायोग आहे, पाच वर्षापूर्वी याच दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी केला होता. यामुळे आता या तारखेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

२०१९ च्या निवडणुकीत सरकार कोण स्थापन करणार या चर्चा सुरू होत्या. शिवसेनेने भाजपसोबत चर्चा थांबवल्यामुळे मोठा पोच निर्माण झाला होता. अनपेक्षीत राजकीय घडामोडीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ च्या भल्या पहाटे शपथविधी उरकला होता.

योगायोगाने आता त्याच दिवशी यंदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणूक निकाला दिवशीच’पहाटेचा शपथविधीची चर्चा सुरू आहे.

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी पार पडलेला पहाटेचा शपथविधी सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात टीकेचा विषय बनला होता. आता त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याने सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाही एकाच फेरीत झाल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रात २८८ जागांसाठी निवडणुकीत एकूण ६१.४ टक्के मतदान झाले होते. भाजपाने यावेळी १०५ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेला ५६ तर काँग्रेस ४४, राष्ट्रवादीने ५४ जागांवर विजय मिळवला होता. निकालानंतर महाविकास आघाडी स्थापनेबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले होते. बैठकसत्रादरम्यान अचानक अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. पण ८० तासानंतर हे सरकार कोसळले होते, अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत गेले होते.

या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीने राज्यात जोरदार प्रचार केला. महायुतीने लाडकी बहीण योजना तसेच शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांचा प्रचार केला. तर महाविकास आघाडीने महागाई, शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न, नव्या योजनांची घोषणा केल्या. दोन्ही बाजूंनी मोठी लढत दिली.

मतदानाची टक्केवारी वाढली

या निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. या निवडणुकीत राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. वाढलेल्या मतदानाची टक्केवारीमुळे उद्या २३ तारखेला येणाऱ्या निकालाची देखील चुरस वाढली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 22-11-2024