Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे अपडेटस आणि निकाल कुठं पाहणार?

Where to check Maharashtra Assembly Election Result 2024 | मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यास काही तासांचा कालावाधी शिल्लक आहे. महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्रं कुणाच्या हाती जाणार याचा कौल महाराष्ट्राच्या मतदानाच्या माध्यमातून नोंदवलं आहे.

राज्यात गेल्या 30 वर्षात पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघात विविध ठिकाणी उद्या सकाळी 8 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. याशिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघात देखील पोटनिवडणूक पार पडली होती. या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी देखील उद्या सुरु होणार आहे.

महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार? दोन्ही आघाड्यांना विश्वास

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा सामना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये झाला होता. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, शेकाप, समाजवादी पक्ष, माकप, भाकप या राजकीय पक्षांचा समावेश होता. याशिवाय महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह आरपीआय आठवले गट, जनसुराज्य पक्ष यांचा समावेश होता. मनसे आणि वंचितनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. याशिवाय संभाजीराजे छत्रपती यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं आघाडी स्थापन करत निवडणूक लढवली होती. मतदानानंतर दोन्ही प्रमुख आघाड्यांनी विजयाचा दावा केला आहे.

महाराष्ट्रात मतदानाच्या टक्केवारीत वाढ

महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत देखील मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा अभ्यास केला असता 1995 नंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?

महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.

https://results.eci.gov.in या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:42 22-11-2024