Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणे, मुंबई भागासह मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला.

यावेळी रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई शहरासह उपनगरात तीव्र ते अतितीव्र पावसाचा अंदाज वर्तवला असून मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चक्राकार वाऱ्यांची स्थिती विदर्भ आणि लगतच्या भागात सक्रीय आहेत. त्यामुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण भागात पावसाचा जोर राहणार आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे.

कोणत्या भागांना पावसाचा अलर्ट?

मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नांदेडमध्ये मध्यम सरींचा अंदाज असून लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरणार

शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. उद्यापासून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

दोन दिवसातील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ

मागील दोन दिवसात झालेल्या पावसानं मराठवाड्यातील धरणपातळीत वाढ झाली असून जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते. मराठवाड्यातील बहुतांश धरणे आता भरण्याच्या मार्गावर असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

पुण्यात जोरदार पाऊस

पुण्यात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात (S P College Ground) मोठ्याप्रमाणावर चिखल झाला आहे. सततच्या पावसामुळे सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात सर्वत्र ओले झाले आहे. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहे. त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कालपासूनच पंतप्रधान मोदींची सभा पार पडू शकणार की नाही, याबाबत साशंकता होती. पुण्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुण्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 26-09-2024