महाराष्ट्रात अतिवृष्टीने दाणादाण!

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी (२५ सप्टेंबर) रोजी पुणे, मुंबईसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात झालेल्या अतिवृष्टीने अक्षरशा झोडपून काढले.

त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने दाणादाण उडाली. मुंबईत वाहतुकीचा खोळंबा झाला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे.

मंगळवारी रात्री आणि बुधवारी छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. विदर्भात मात्र अकोला, बुलढाणा, वाशिम आणि नागपूर जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. विदर्भात मात्र अकोला, बुलढाणा, वाशिम आणि नागपूर जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला.

राज्यात काय परिस्थिती आहे ते वाचा सविस्तर

पुणे : रस्ते झाल्या नद्या

पुण्यात दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडाटसह पावसाने पुणेकरांना झोडपून काढले. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

हिंगोली : सतर्कतेचा इशारा

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

लातूर : मुरुडमध्ये ढगफुटीसदृश बरसला

औसा, मुरुड आणि उदगीरमध्ये मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. सोयाबीन पिकास फटका बसला आहे, मुरुड येथे तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. चार तासांत १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.

बीड : वीज पडून दोन कामगार जागीच ठार

परळी, अंबाजोगाई, गेवराई तालुक्यात शेतांमध्ये पाणी साचल्याने काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात गेले. मंगळवारी सायंकाळी गेवराई तालुक्यात वीज पडून दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

ठाणे : शहापूर, मुरबाडला दोघांचा मृत्यू

ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ- बदलापूरमध्येही जोरदार पाऊस बरसला. शहापूर आणि मुरबाड तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

बुलढाणा : विद्यार्थ्यास काढले पुरातून बाहेर

जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. खामगावमधील बोडर्डी नदीलाही पूर आला. या पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका आठ वर्षीय शाळकरी मुलास नागरिकांनी बुधवारी सायंकाळी बाहेर काडले.

पालघर : रुळावर पाणी, वाहतूक प्रभावित

पश्चिम रेल्वेच्या वाणगाव स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतूक पहाटेपासून सकाळी १० वाजेपर्यंत उशिराने सुरू होती. लांब पल्ल्याच्या अप व डाऊन मार्गावरील गाड्या उशिराने धावत होत्या.

अलिबाग : वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील खोपोलीत झालेल्या पावसाने येथील झेनिथ धबधब्याचे पाणी अचानक वाढले, कुटुंबीयांसह धबधब्यावर गेलेली २२ वर्षीय तरुणी पाण्यात वाहून गेली. तिचा मृतदेह सापडला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 26-09-2024