मुख्यमंत्री निवासस्थानावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. राज्यात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले. महायुतीने राज्यात २३० जागा जिंकल्या. दरम्यान, आता मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत.

महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजपा आहे, भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री हा भाजपाचा होईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पण दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनीही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळायला पाहिजे अशी मागणी केली आहे.

तर दुसरीकडे नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावरील सीएम एकनाथ शिंदे यांची नेमप्लेट काढण्यात आली होती. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे आता काही तासानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे नेमप्लेट लावण्यात आले आहे. यामुळे आता पुढच्या काही दिवसात कोण मुख्यमंत्री होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांना दिल्या सूचना

विधानसभा निवडणुकीत भाजप १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपनंतर सर्वाधिक जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. ५७ जागा जिंकत दुसऱ्या स्थानी असलेल्या शिवसेनेतून आता एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची मागणी होऊ लागली आहे.

शिवसेनेचे काही आमदार, नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीलाही गेले होते. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे निरोप गेले असल्याचे समजते. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज दिला आहे.

एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे की, “महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत.”

“माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 26-11-2024