हा एकच एन्काउंटर का?, ज्याने ज्याने बलात्कार केलेत त्यांचेही एन्काउंटर करा : संजय राऊत

मुंबई : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ज्याप्रकारे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, हा एकच एन्काउंटर का, ज्याने ज्याने बलात्कार केलेत त्यांचेही एन्काउंटर करा असं सांगत खासदार संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिले आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलत होते, ते म्हणाले की, हे लोक स्वत:ला सिंघम समजतात, सिंघम सिनेमा काल्पनिक कथेवर बनला होता. बदलापूर एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाने सवाल उपस्थित केलेत. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. फास्टट्रॅक कोर्टात याला विलंब नको, मात्र तुमच्या राजकीय स्वार्थासाठी एन्काउंटर केला ते चुकीचे आहे. एन्काउंटरच्या श्रेयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात स्पर्धा सुरू आहे. त्यातच सर्व स्पष्ट होते. हे किती मोठे राजकारण आहे असं सांगत त्यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला.

तसेच देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त महिलांवर अत्याचार, बलात्कार आणि हत्या झाल्यात. किती लोकांचे एन्काउंटर केले? कालच नालासोपारा इथं सामुहिक बलात्कार प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्याला पकडले, मग देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सिंघम त्याचा एन्काउंटर करणार का? एन्काउंटर एकच का, ज्याने ज्याने बलात्कार केलेत त्यांचेही एन्काउंटर करा, आम्ही समर्थन करू असं संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, तुम्ही एका प्रकरणात एन्काउंटर करता कारण त्यामागे एक रहस्य आहे. संस्थेचे मालक भाजपा-आरएसएसशी संबंधित आहेत. त्यांना वाचवण्यासाठी हे एन्काउंटर केले. देशात आणि राज्यात तुमच्या काळात जितके बलात्कार झालेत, त्यातील आरोपीचे एन्काउंटर करावं असा टोला संजय राऊतांनी महायुतीला लगावला.

मविआच्या जागावाटपात संघर्ष?

जागावाटपावरून काँग्रेसचे २ नेते पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची दिल्लीत भेट घेणार आहेत यावर संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर काँग्रेस असो वा कुठल्याही पक्षाचे हायकमांड संयमाने आणि शांततेने जागावाटपाचं काम झालं पाहिजे अशी यांची भूमिका आहे असं सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 26-09-2024