राज्यघटनेचे दररोज वाचन करा : माणिकराव सातव

रत्नागिरी : समाजात सर्वांना घटनारूपी काठीची गरज आहे. स्वतःच्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली काठी म्हणजे सर्वश्रेष्ठ राज्यघटना होय. तिचे वाचन दररोज करा, घटना समजून घ्या, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, समाजकल्याण उपायुक्त रवींद्र कदम, सहायक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक संतोष चिकणे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सातव म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिताना सर्व घटकांचा विचार केला. सामान्य माणूस, कामगार, महिला, मुलं, शोषित वर्ग यांच्याबरोबरच उच्च शिक्षितांचाही विचार केला आहे. प्रत्येकांनी चौकटीत राहून आपापले काम प्रामाणिकपणे पार पाडावे. सक्तीच्या मोफत शिक्षणामुळे तुम्हा आम्हा सर्वांना शिक्षण मिळाले. आजच्या संविधान दिनानिमित्ताने दररोज किमान ५ कलमांचे वाचन करून राज्यघटना समजून घ्या. जसे मूलभूत अधिकार दिले आहेत तसेच कर्तव्येही सांगितली आहेत. समाज निरोगी आणि स्वच्छ राहिला पाहिजे तसे प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सातपुते म्हणाले, कारभाऱ्यांना अधिकार आणि कारभाऱ्यांवर नियंत्रण या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी नियमांचा संच म्हणजे राज्यघटना होय. घाटे यांनी प्रास्ताविकात ‘घर घर संविधान’ कार्यक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनही करण्यात आले. समाजकल्याण निरीक्षक प्रताप कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 27/Nov/2024