रत्नागिरी : भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू

रत्नागिरी : राज्यात दीड कोटी पक्ष सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रत्येक विधानसभा मतदार संघात 50 हजार सदस्य नोंदणी करायची असून, त्यासाठी प्रत्येक सदस्याचे योगदान अपेक्षित आहे. पक्षात प्रत्येक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमध्ये स्पर्धा असली पाहिजे पण ती विरोधकांबरोबर हवी, आपल्यातच नको, असे प्रतिपादन राज्याचे बांधकाम मंत्री व भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी केले. प्रत्येक कार्यकर्त्यांने आपल्या कामाने आपली रेषा मोठी करा, त्यासाठी दुसर्‍याची पुसू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यकारिणीतर्फे सदस्य नोंदणी अभियान मंगळवारी स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडले. यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील महायुतीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी लोकसभा प्रभारी माजी आ. प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, राजन देसाई, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, शहराध्यक्ष राजन फाळके, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, द. र रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, उत्तर रत्ना. महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, युवक जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषीकेश केळकर, रविंद्र नागरेकर, प्रदेश महिला सरचिटणीस चित्रा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, ज्यांच्या जिवावर सत्तेची पायरी चढतात, त्याच कार्यकर्त्यांचा मग विसर पडतो. मात्र, भाजपमध्ये कार्यकर्त्याला प्रथम मान आहे. त्यांच्या भावनांचा अधिक विचार केला जातो. विधानसभेला प्रत्येक गावखेड्यात कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच महायुतीला मोठे यश मिळाले आहे. यात नेतृत्वानेही मोठी मेहनत घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अपमानही पाहिला आहे; पण आता सुगीचे दिवस कार्यकर्त्यांना आले आहेत.

आगामी काळात महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा निवडणुका आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून, प्रत्येकाने प्रामाणिक काम करायला हवे. स्पर्धा असली पाहिजे ती विरोधकांबरोबर, आपल्यातच ठेवू नका तरच रत्नागिरी जिल्हा आपण सहज जिंकू शकू असा विश्वासही रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयाचे शिल्पकार असून, पक्षाला शंभरी पार नेणारे फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, अशी सर्वसामान्य कार्यकर्ते व जनतेची इच्छा आहे. असा ठराव जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी मांडला. त्याला माजी आ. प्रमोद जठार यांनी अनुमोदन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 27-11-2024