Breaking : संजय राऊत यांना 15 दिवसांचा तुरुंगवास

मुंबई : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

या प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आला आहे. 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने निकाल दिला आहे. 2022 सालचे हे प्रकरण आहे. मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता.

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल, त्यानंतर ते कारावासाची शिक्षा कमी करण्याबाबत विनंती करु शकतात.

मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होती. संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी, बदनामीची नोटीस दिली आहे, मुलुंड पोलिस स्टेशन येथे तक्रार ही दाखल केली आहे. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, एक रुपयाचा घोटाळाचे पुरावे/ कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी, बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 26-09-2024