रत्नागिरी : सहकारनगर येथील पाण्याच्या टाकीला गळती; प्रभाग ५, ६ मध्ये झळ

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील सहकारनगर येथील पाण्याच्या टाकीला मोठी गळती लागली असून, त्याचा फटका प्रभाग क्र. ५ व ६ मधील नागरिकांना बसला आहे. गळतीमुळे सहकारनगर, राजेंद्रनगर, नूतननगर, साळवी स्टॉप, नरहर वसाहत, विश्वनगर, आंबेशेत, आनंदनगर, मार्ती मंदिर परिसरातील लोकांना पाणीटंचाईची झळ बसली असून, काही ग्राहकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

सहकारनगर परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानंतर पाण्याच्या टाकीला गळती लागल्याचे पुढे आले. त्यानंतर भाजपचे शहर खजिनदार शैलेश बेर्डे, नीलेश आखाडे, भाजप महिला मोर्चा पदाधिकारी सायली बेर्डे, जिल्हा पदाधिकारी नितीन गांगण, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे आदींनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सहकारनगर येथील पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तेथील नागरिकांबरोबर चर्चा केली. त्या टाकीमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून, गेली अनेक वर्षे हा प्रकार वारंवार घडत आहे, अनेकवेळा पाण्याच्या समस्येबाबत मागणी करूनही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. तेथील नागरिक आंबडेकर, हर्चेकर, कुवर, भाटवडेकर, बेहेरे, जोशी आदींनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला. याबाबत त्वरित उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करू, असे उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने याकडे गांभीयनि पाहत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी आणि तेथील स्थानिक रहिवासी यांनी केली आहे. मुख्याधिकाऱ्यांशी बोलून यावर त्वरित मार्ग काढणार असल्याचे शैलेश बेर्डे, नीलेश आखाडे यांनी स्थानिकांना बोलताना सांगितले.

शहरातील सहकारनगर येथील साठवण टाकी सुमारे ३० वर्षापूर्वीची जुनी आहे त्याचे पाईप खराब झाले आहेत. बंगालहून त्या मागवल्या असून, लवकरच त्या येतील. त्यानंतर टाकीचे पूर्ण काम तीन दिवसांमध्ये सुरू केले जाईल. – तुषार बाबर, मुख्याधिकारी रत्नागिरी पालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 27/Nov/2024