रत्नागिरी : कर्नाटकची मच्छीमार नौका सहायक मत्स्य व्यवसाय विभागाने मिरकरवाडा बंदरात रोखून ठेवली आहे. या कारवाईचा सुपरिणाम झाला असून, राज्याच्या सागरी क्षेत्रात परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीवर नियंत्रण आले आहे.
चार दिवसांपूर्वी कर्नाटकची अल बहर मच्छीमार नौका मिरकरवाडा बंदरात येत असल्याची माहिती मिळाली, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांच्यासह त्यांच्या परवाना अधिकाऱ्यांनी तातडीने जावून ती नौका ताब्यात घेतली. बंदर बदलताना नौकेला परवाना घ्यावा लागतो. कर्नाटकच्या नौकेने तर कोणतीही परवानगी न घेता राज्यच बदलले होते. त्यामुळे सहायक मत्स्य व्यवसाय विभागाने त्या नौकेला ताब्यात घेऊन मिरकरवाडा बंदरात अटकावून ठेवले आहे, याप्रकरणी आता सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे सुनावणी होऊन निर्णयानुसार पुढील कार्यवाही होणार आहे.
परप्रांतीय वेगवान मच्छिमार नौका ४० ते ५० इतक्या संख्येने रत्नागिरीच्या समुद्रात येऊन घुसखोरी करत मासे पकडून नेतात. मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने त्यांचा माग काढला तर त्या परप्रांतीय लोखंडी नौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या फायबर गस्ती नौकेला धडक देण्यासाठी येतात. काही दिवसांपूर्वी परप्रांतीय नौकांकडून हा प्रयत्नसुद्धा झाला असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त पालव यांनी मान्य केले, आता कर्नाटकची नौका चार दिवसांपासून अटकावून ठेवल्याने इतर परप्रांतीय नौकांनी धास्ती घेतली आहे. रत्नागिरी समुद्रात राज्याच्या सागरी क्षेत्रात अशा परप्रांतीय नौकांची गेल्या चार दिवसांपासून घुसखोरी कमी झाली आहे. स्थानिक मच्छीमारांनीही याला दुजोरा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 27/Nov/2024














