रत्नागिरी : मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या १२०० मीटरच्या टप्प्याचे काम अजूनही ठप्प आहे. पत्तन विभागाने काम सुरू करण्याचे आदेश तीन आठवड्यांपूर्वी देऊनही ठेकेदार काम सुरू करण्यास चालढकल करत असल्याचे पत्तन विभागाने सांगितले. या पावसाळ्यात बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत काम न झाल्यास मात्र जयहिंद चौक ते पांढरा समुद्र भागाला समुद्राच्या उधाणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सुमारे साडेतीन कि.मी.चा हा बंधारा असून, त्यापैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे. पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे. परंतु, पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. या टप्प्याचे काम करताना यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी लागणारी जागेवरून वाद निर्माण झाला होता. जागा मालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. हे काम व्हावे, यासाठी स्थानिकांनी पत्तन विभागाला निवेदनही दिले. परंतु, पावसाळा सुरू झाला आणि काम थांबले होते.
पावसाळा संपल्यामुळे पत्तन विभागाने तीन आठवड्यांपूर्वी ठेकेदाराची बैठक घेतली. लवकरात लवकर उर्वरित टप्प्याचे आणि बंधाऱ्याच्या टॉपचे काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या होत्या. त्यानुसार आठवडाभरात हे काम सुरू होईल, असे पत्तन विभागाने सांगितले.
मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या सुमारे अडीचशे मीटरच्या टप्प्याच्या कामाचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे या धोकादायक टप्प्याचे काम आता पावसाळ्यानंतर होणार आहे. परंतु, उधाणाच्या भरतीमुळे काही धोका झाल्यास त्याची तयारी आम्ही ठेवल्याची माहिती पत्तन विभागाने दिली. त्यामुळे पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंत किनाऱ्याची धूप होण्याचा धोका कायम आहे. या पावसाळ्यात जयहिंद चौकासमोरील संरक्षित केलेला बंधाऱ्याचा काही भाग समुद्राच्या अजस्र लाटांनी गिळंकृत केला आहे. त्यामुळे उधाणाची भरती आणि भविष्यातील पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्याचे काम सुरू होणे आवश्यक आहे. अन्यथा वाहून गेलेल्या बंधाऱ्याच्या ठिकाणी भगदाड पडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 27/Nov/2024














